Breaking News

फिफा फुटबॉल विश्वचषक:‘फ्रेंच जगज्जेता’



मॉस्को वृत्तसंस्था

फिफा विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत फ्रान्सने क्रोएशियावर ४-२ असा विजय मिळवून २० वर्षानंतर जगज्जेतेपदाचा बहुमान पटकावला. ग्रिझमन, पॉल पोग्बा आणि किलियन एम्बापे यांनी नोंदविलेल्या गोलच्या जोरावर फ्रान्सने अंतिम लढतीत क्रोएशियावर ४-२ ने मात केली आणि दुसऱ्यांदा जगज्जेतेपद पटकावले. यापूर्वी, १९९८ मध्ये फ्रान्सने ही प्रतिष्ठेची स्पर्धा जिंकली होती. फ्रान्सने पूर्वार्धात २ आणि उत्तरार्धात २ असे एकूण ४ गोल केले. तर क्रोएशियाने पूर्वार्ध आणि उत्तरार्धात प्रत्येकी १-१ गोल केला. विशेष म्हणजे सामन्यात चेंडूचा ६१ टक्के ताबा क्रोएशियाकडे असूनही त्यांना हार पत्करावी लागली.सामन्याच्या पूर्वार्धात १८व्या मिनिटात फ्रान्सला फ्री किक मिळाली. फ्रान्सला मिळालेल्या फ्री किकचा बचाव करताना क्रोएशियाकडून मॅन्झुकिचने आत्मघातकी ओन गोल केला. त्यामुळे फ्रान्सला आघाडी मिळाली. २८ व्या मिनिटाला क्रोएशियाकडून पेरिसिचने गोल करून संघाला बरोबरी साधून दिली. त्यांनतर ३८व्या मिनिटाला फ्रान्सला पेनल्टी किक मिळाली. याचा फ्रान्सने लाभ घेतला. अनुभवी ग्रीझमनने थेट गोल करत फ्रान्सला आघाडी मिळवून दिली. त्यामुळे मध्यंतरापर्यंत फ्रान्सने २-१ अशी आघाडी राखली.

उत्तरार्धात पोगबाने ५९व्या मिनिटाला दुसऱ्या प्रयत्नात गोल केला आणि फ्रान्सला ३-१ अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर लगेचच ६५व्या मिनिटाला एमबापेने गोल करत फ्रान्सच्या आनंदात भर घातली. त्यामुळे फ्रान्स ४-२ ने आघाडीवर गेले.

बक्षिसांची लयलूट

फ्रांस (विजेता संघ)

२६० कोटी २८ लाख ७४ हजार ६०० रुपये

क्रोएशिया (उपविजेता विजेता संघ)

१९१ कोटी ७९ लाख ७ हजार ६०० रुपये

बेल्जीयम (तिसऱ्या क्रमांकाचा संघ)

१६४ कोटी ३९ लाख २० हजार ८०० रुपये

इंग्लड (चौथ्या क्रमांकाचा संघ)

१५० कोटी ६९ लाख २७ हजार ४०० रुपये

उपांत्यपूर्व फेरी (प्रत्येकी)

१०९ कोटी ५९ लाख ४७ हजार २०० रुपये

उप-उपांत्यपूर्व फेरी (प्रत्येकी)

८२ कोटी १९ लाख ६० हजार ४०० रुपये

साखळीतून बाहेर (प्रत्येकी)

५४ कोटी ७९ लाख ७३ हजार ६०० रुपये

गोल्डन बूट - हेरी केन (इंग्लंड)

गोल्डन ग्लोज- थिबाऊट क्वार्टोइस(बेल्जीयम)

गोल्डन बॉल- लुका मोडेरिच (क्रोएशिया)

युवा खेळाडू - कायलिन एम्बापे (फ्रांस)