Breaking News

कैलास वाकचौरे यांनी दिंडीत घेतला फुगडीचा आनंद



अकोले / प्रतिनिधी
श्री क्षेत्र अगस्ती आश्रम ते पंढरपूर या पायी दिंडी सोहळ्यात जिल्हा परिषदेचे अर्थ व बांधकाम समितीचे सभापती कैलास वाकचौरे यांनी सहभाग नोंदविला. या दिंडी सोहळ्यात कैलास वाकचौरे यांनी फुगडीचा मनमुराद आनंद घेतला.
आषाढी एकादशीनिमित्त श्री क्षेत्र अगस्ती ते पंढरपूर पायी दिंडी सोहळ्याचे, गत अनेक वर्षांपासून आयोजन केले जात आहे. देवगडच्या दिंडीनंतर सर्वात मोठी दिंडी म्हणून, अगस्ती दिंडीचा नावलौकिक आहे. शांतताप्रिय व पर्यावरण पूरक दिंडी म्हणून अगस्ती आश्रमाच्या दिंडीची ओळख आहे. या दिंडीत अकोले तालुक्यातील 500 पेक्षा जास्त वारकरी सामील झाले आहेत. अगस्ती आश्रमाची दिंडी काल नगर जिल्ह्यातील राहुरी परिसरात पोहचली असता, अहमदनगर जिल्हा परिषदेचे अर्थ व बांधकाम समितीचे सभापती कैलास वाकचौरे यांनी या पायी दिंडीला भेट दिली. यावेळी कैलास वाकचौरे यांनी या पायी दिंडीत पायी चालून विठू नामाचा गजर केला. राहुरी ते दहेगाव या पायी प्रवासात कैलास वाकचौरे यांनी अगस्ती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष अ‍ॅड. के. डी. धुमाळ, कॉम्रेड शांताराम वाळुंज यांच्या समवेत फुगडीचा मनमुराद आनंद घेतला. विठूनामाच्या गजरात सर्वच दंग होऊन नाचले. दरम्यान या तिघांचा फुगडी खेळतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर सर्वत्र व्हायरल झाला आहे. आज अगस्ती महाराजांची दिंडी गोबरगावात मुक्कामी असल्याची माहिती अगस्ती देवस्थान ट्रस्टचे व्यवस्थापक रामनाथ मुतडक यांनी दिली.