Breaking News

कर्जाला कंटाळून तरुण शेतकर्‍याची आत्महत्या.


सोनई - प्रतिनिधी 
सोनई जवळील कन्हेरवस्ती येथील तरुण शेतकर्‍याने कर्जाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. याबाबत सोनई पोलीस स्टेशनला आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. 
याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की कन्हेरवस्ती येथील तरुण शेतकरी सखाराम तुकाराम निमसे (वय 33) यांनी कर्जाला कंटाळून शेडमध्ये गळफास घेऊन आत्महत्त्या केली. शुक्रवार दि.13 जुलै रोजी सकाळी भल्या पहाटे निमसे वस्ती येथे शेडमध्ये सखाराम हे लटकलेल्या स्थितीत दिसून आल्याने नातेवाईक व घरच्या लोकांनी अतिशय घाईने त्यांना शिंगणापूरच्या ग्रामीण रुग्णालयात नेले. परंतु दवाखान्यात पोहोचण्यापूर्वीच सखाराम निमसे यांचा मृत्यू झाल्याचे डॉ. कोरडे यांनी तपासणी करून सांगितले. तसेच याबद्दलचा अहवाल सोनई पोलीस ठाण्यात कळविल्यावरून सोनई पोलिसांनी अकस्मात मृत्यूचा गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉ . प्रवीण आव्हाड पुढील तपास करीत आहेत. मृताच्या प्रेताची उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिल्यानंतर कन्हेरवस्ती येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. सखाराम तुकाराम निमसे हा घरची शेती करीत असे शेतीसाठी त्याने बँकेकडून काही कर्जही घेतल्याचे समजते मात्र गेल्या 4 ते 5 वर्षापासून कमी पावसामुळे शेतीमधून अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्याने तो सतत विचार मग्न असे शेतीतून अपेक्षित उत्पन्न न मिळाल्याने कर्जही वाढत चालले होते अशा मानसिकतेतून त्याने आपली जीवनयात्रा संपवली. त्यांच्या पश्‍चात पत्नी, एक लहान मुलगा, मुलगी , बंधू, पुतणे असा मोठा परिवार आहे. सखाराम हा अत्यंत मनमिळाऊ स्वभावाचा असल्याने सोनई परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.