बाजारतळावर जाण्यासाठी करावी लागते तारेवरची कसरत
नगरपरिषदेकडून डोळेझाक, सर्वत्र चिखलाचे साम्राज्य
अकोले / प्रतिनिधी । 19 - शहरातील बाजारतळावर सर्वत्र पावसामुळे चिखलाचा खच साचला आहे. बाजारतळात प्रवेश करणारा प्रत्येक नागरिक आपले कपडे गुडघ्यापर्यंत वर केल्याशिवाय बाजारतळात प्रवेश करू शकत नाही, इतकी बिकट अवस्था या बाजारतळाची झाली आहे. आठवडे बाजाराच्या दिवशी शेतकरी व्यापार्यांकडून न चुकता जागेचे भाडे आकारणार्या अकोले नगरपंचायतीला हा गाळाचा राडा आता दिसत नाही का? असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.अकोलेचा आठवडे बाजार दर गुरुवारी मोठ्या थाटामाटात शहरातील बाजारतळात भरतो. परंतु पाऊस सुरू झाला की, या बाजारतळाची पुरती वाट लागून जाते. बाजारतळात मोजक्याच ठिकाणी सिमेंट आणि मुरुमाचे रस्ते आहेत. त्यामुळे पावसाळ्यात बाजारतळात सर्वत्र गाळ आणि गाळच तयार होतो. आठवडे बाजारच्या दिवशी दुपारच्या वेळी या बाजारतळात पाय ठेवायला जागा होत नाही, इतके नागरिक खरेदीसाठी अकोलेत दाखल होतात. मात्र नियोजनाचा अभाव आणि नागरिकांच्या आरोग्याशी खेळण्याच्या नगर पंचायतीच्या धोरणामुळे या बाजारतळावर काहीच सोयी सुविधा उपलब्ध करण्यात आलेल्या नाहीत. बाजार तळावर विक्रीसाठी येणार्या शेतकर्यांकडून नगर पंचायत 10-20 रुपये याप्रमाणे कर आकारते. कर वसूल केल्यानंतर नगर पंचायतचे कर्मचारी या परिसरात फिरकतदेखील नाहीत. त्यामुळे काही शेतकरी व्यापारी आपला उरलेला माल बाजार तळावरच फेकून देतात. हा फेकून दिलेला माल एक ते दोन दिवसात सडून जातो. त्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरले जाते. परिणामी कुत्रे, डुकरे हे या मालावर येऊन मनसोक्त लोळतात. आठवडे बाजार वगळता, या ठिकाणी इतर दिवशीदेखील नागरिकांची मोठी गर्दी पहायला मिळते. मच्छी बाजार याच परिसरात भरतो. त्यामुळे बाजारतळ परिसरात नागरिकांची कायमच वर्दळ चालू असते. सध्या या बाजार तळावर प्रचंड घाणीचे साम्राज्य पसरले असून, नागरिकांना जमिनीवर पाय टेकविणेदेखील कठिण झाले आहे. मागच्या आठवडे बाजारात शेतकरी व्यापार्यांनी बाजार तळावर टाकून दिलेला माल सडून गेलेल्या अवस्थेत आहे. बाजार तळावर आल्यानंतर जमिनीवर पाय कुठे ठेवायचा, असा प्रश्न नागरिकाना पडलेला दिसतो. काही मासे विक्रेत्यांनी नगर पंचायतीच्या भरवशावर न बसता स्वखर्चाने आपल्या दुकांनसमोर मुरमाचे ट्रॅक्टर आणून ओतले आहेत. आमचं पोटपाणी या धंद्यांवर चालते, त्यामुळे मालाला गिर्हाईक मिळावे म्हणून, मुरूम दरवर्षी टाकावा लागतो, अशा प्रतिक्रिया हे विक्रेते देत आहेत. आज अकोलेचा आठवडे बाजार आहे, या बाजारात नागरिकांना त्रास होणार नाही, याची काळजी अकोले नगरपंचायतीने घेणे आवश्यक आहे. याखेरीज शेतकरी व व्यापार्यांना आपला उरलेला माल स्वतः उचलून नेण्याची ताकीद नगर पंचायतीने देणे गरजेचे आहे. तसेच बाजार तळावर निर्माण झालेला गाळ ट्रॅक्टरच्या सहाय्याने ओढून नागरिकांना दिलासा देण्याची गरज आहे.
अकोले नगर पंचायत आठवडे बाजाराच्या दिवशी शेतकरी व व्यापार्यांकडून जागेचे भाडे म्हणून विशिष्ट रकमेचा कर आकारते.शहर विकासासाठी कर आकारने गरजेचे आहे, परंतु कर भरणार्या शेतकर्यांनाच बाजारतळात बसायला चांगली जागा मिळत नसेल तर, ही अत्यंत खेदाची बाब मानवी लागेल. अकोले नगर पंचायतीने या बाबीकडे गांभीर्याने पाहून बाजारतळ परिसराची स्वच्छता व डागडुजी करणे गरजेचे आहे.