Breaking News

त्या ठेकेदारावर कायदेशीर कारवाई व्हावी; शिवसेना तालुकाप्रमुख धुमाळ यांची मागणी


अकोले / ता. प्रतिनिधी 
तालुक्यातील समशेरपूर गावात सुरू असलेले बाजार ओट्याचे काम अतिशय निकृष्ट पद्धतीने सुरू आहे. या कामाचा ठेका घेणार्‍या ठेकेदाराची चौकशी होऊन त्याच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी शिवसेनेचे अकोले तालुकाप्रमुख मच्छिंद्र धुमाळ यांनी केली आहे.
राज्य सरकारच्या पणन विभागांतर्गत समशेरपूर गावातील बाजार ओट्यांना शासनाने तब्बल 27 लाख रुपये मंजूर केले आहेत. ग्रामपंचायतीच्या मालकीच्या असलेल्या चार ते पाच गुंठ्यांमध्ये या बाजार ओट्यांचे काम सध्या सुरू आहे. मात्र या कामाच्या गुणवत्तेत ठेकेदाराने मोठा हजगर्जीपणा केला आहे. या कामाची गुणवत्ता पूर्ण ढासळली असून, या कामाची सखोल चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी मच्छिंद्र धुमाळ यांनी पत्रकाद्वारे केली आहे. ठेकेदार आणि अधिकारी यांनी संगनमताने या कामात मोठा गैरव्यवहार करण्याचा घाट घातला आहे. सुरू असलेले बांधकाम चुकीच्या पद्धतीने सुरू असून शासनाची सर्रास फसवणूक सुरु आहे. या कामाच्या दर्जाबाबत पुणे येथील पणन विभागाच्या कार्यालयात जाऊन लेखी तक्रार करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच या कामाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणार्‍या अधिकार्‍यांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करणार असल्याचेही धुमाळ म्हणाले. या कामाची इतकी दुरावस्था झालेली आहे की, पूर्ण झालेले एका जागेवरून दुसर्‍या जागेवर सहज हलविता येईल. महाराष्ट्र राज्यात आत्तापर्यंत इतके निकृष्ट दर्जाचे काम कुठेच झालेले नसेल, असेही धुमाळ म्हणाले. या कामाची अधिकार्‍यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी करावी, मग प्रशासकीय अधिकारी आणि ठेकेदारावर कारवाई करावी,अशी मागणी धुमाळ यांनी केली आहे.

समशेरपूरच्या बाजार ओट्यांचे काम मी घेतलेले नाही. संबंधीत काम घेण्यासाठी माझे नाव सुचविण्यात देखील आले होते. परंतु हे काम मी घेतलेले नाही. कोतुळच्या ओम साई कन्स्ट्रक्शन या ठेकेदाराने हे काम घेतले आहे. माझे दुसरे काम तिथेच शेजारी सुरू असल्याने माझ्या कामाचे सेंटरिंग मटेरियल त्या कामावर वापरले जात आहे.
संजय फरगडे
उपसरपंच, ग्रामपंचायत मेहेंदुरी

बाजार ओट्यांचे काम निकृष्ट पद्धतीने चालू आहे, अशा तक्रारी माझ्याकडे अद्याप आलेल्या नाहीत. सदर बाजार ओट्यांचे काम ओम साई कन्स्ट्रक्शनच्या ठेकेदाराकडून संजय फरगडे या ठेकेदाराने तोडून घेतले आहे.
राजेंद्र वर्पे
ग्रामसेवक, ग्रामपंचायत समशेरपूर