Breaking News

कल्याणकारी योजनांची कामगारांपर्यंत पोहचवा- संभाजी पाटील निलंगेकर

कामगारांसाठी शासनाच्या अनेक योजना आहेत. मात्र या योजनांची माहिती कामगारांना नसल्यामुळे अनेक कल्याणकारी योजनांपासून ते वंचित राहतात. कामगार कल्याण विभाग हा समाजाच्या शेवटच्या घटकातील लोकांना न्याय देणारा विभाग आहे. त्यामुळे विभागाच्या योजनांची माहिती त्यांच्यापर्यंत पोहचवा, अशा सुचना कामगार मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयातील राष्ट्रीय सुचना केंद्रात अटल विश्वकर्मा सन्मान योजनेंतर्गत कामगारांच्या विशेष नोंदणी अभियानाच्या दुस-या टप्प्याचा शुभारंभ करतांना ते बोलत होते. कामगार विभागाच्या अधिका-यांनी नोंदणी अभियानाच्या पहिल्या टप्प्यात अतिशय चांगले काम केले असे सांगून कामगार मंत्री संभाजी पाटील निलंगेकर म्हणाले, विशेष नोंदणी अभियानाच्या दुस-या टप्प्यात 12 जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे. या जिल्ह्यांमध्ये 4 जुलै ते 4 ऑगस्ट या कालावधीत 2.60 लक्ष कामगारांची नोंदणी करण्यात येणार आहे. राज्यात सुरवातीला केवळ 3 लक्ष कामगारांची नोंदणी होती. आजघडीला संपूर्ण राज्यात 9 लक्ष कामगारांनी नोंदणी केली आहे. समाजातील शेवटच्या घटकातील लोकांना न्याय देणारा हा विभाग आहे. जिल्ह्यातील अधिका-यांनी प्रत्येक कामगारांपर्यंत पोहचून त्यांची नोंदणी करावी. मनरेगा अंतर्गत काम करणा-या कामगारांच्या याद्या घेऊन त्यांनासुध्दा नोंदणी अभियानात सामील करून घ्यावे. कामगार विभागामार्फत 28 कल्याणकारी योजनांचा कामगारांना लाभ देण्यात येतो. या कल्याणकारी योजनांची माहिती कामगारांपर्यंत पोहचवा, अशा सुचना त्यांनी केल्या.