Breaking News

कार दुरूस्तीस विलंब केल्याने 60 हजार रूपयांची नुकसान भरपाई

मोटार अपघातात कारचे नुकसान झाल्याने कार मालकाने दुरूस्तीसाठी टाकलेली कार वेळेत दुरूस्त करून न दिल्याने अहमदनगर येथील जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंचाने संगमनेर येथील शिरोडे कार प्रा. लि. यांना चांगलीच चपराक दिली. कार वेळेमध्ये दुरूस्त करून न दिल्याने कार मालकास शारिरीक, मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई म्हणून 50 हजार रूपये, तक्रारीचा खर्च 10 हजार रूपये असे एकूण 60 हजार रूपये संगमनेर येथील शिरोडे कार प्रा. लि. यांनी एका महिन्यात तक्रारदारास द्यावे असा आदेश जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाचे अध्यक्ष व्ही.सी प्रेमचंदाणी, सदस्य चारू डोंगरे, एम.एन. ढाके यांनी नुकताच दिला. कार मालकामार्फत अ‍ॅड. सुरेश लगड यांनी काम पाहिले. त्यांना अ‍ॅड. शारदा लगड व अ‍ॅड. सुजाता बोडखे यांनी सहाय्य केले.
याबद्दल सविस्तर माहिती अशी की, संगमनेर तालुक्यातील राजापूर येथील उमेश रमेश गायकवाड यांनी संगमनेर येथील हुंदाई कारचे डिलर शिरोडे कार प्रा. लि. यांचेकडून हुंदाई कार (एम.एच.17 ए.झेड 8097) विकत घेतली, तिचा अपघात झाल्याने ती कार दुरूस्तीसाठी दि.19 एप्रिल 2016 रोजी दिली, सदर कार दीड महिण्यात दुरूस्त करून न दिल्याने कार मालकाने शिरोडे कार प्रा. लि. कडे अनेकदा चकरा मारल्या, शेवटी कार मालकाने तब्बल 5 महिण्यानंतर व्यवस्थित दुरूस्त न करताच कार मालकाकडे सुपूर्त केली. तक्रारदार गायकवाड हे बांधकाम व्यवसायाशी निगडीत असल्याने कार दुरूसतीस दिल्याने त्यांना या कालावधीत भाडे तत्वावर कार घेवून, त्यावर चालक ठेवून त्यांचे कामकाज करावे लागले. वेळेत कार दुरूस्त न झाल्याने त्यांना मानसिक आणि आर्थिक त्रास सहन करावा लागला. त्यामुळे तक्रारदाराने शिरोडे कार यांचेविरूद्ध मानवी हक्क मानव अधिकार संघटनेकडे तक्रार केली होती. वकिलांमार्फत कायदेशीर नोटीस पाठवून नुकसान भरपाईची मागणी केली असता, त्यांनी नोटीस मिळूनही नुकसान भरपाई न दिल्याने तक्रारदाराने अ‍ॅड. सुरेश लगड यांचेमार्फत ग्राहक संरक्षण कायदा 1986, कलम 12 नुसार तक्रार दाखल केली असता, तक्रारदारांस एकंदरीत 60 हजार रूपये तक्रारीच्या खर्चासह नुकसान भरपाई मंजूर झाली आहे. शिरोडे कार प्रा.लि. यांचेमार्फत ग्राहक मंचात कोणीही उपस्थित न राहिल्याने त्यांचेविरूद्ध एकतर्फा प्रकरण चालविण्याचा आदेश पारित करण्यात आला.