संगणक शिक्षकांना मानधन तत्त्वावर सामावून घेणार
श्रीरामपूर प्रतिनिधी
संगणक शिक्षकांना मानधन तत्त्वावर सामावून घेण्याबाबतचा प्रस्ताव प्राप्त झाला असून सेवा केलेल्या शिक्षकांना सामावून घेण्याबाबत प्रस्तावास लवकर मजुंरी देऊ असे आश्वासन ना. प्रकाश जावडेकर मंत्री, मनुष्यबळ विकास भारत सरकार यांनी शिष्टमंडळाला दिले.
दिल्ली येथे शास्त्री भवनमध्ये संगणक शिक्षकांना मानधनावर सामावून घेण्याच्या प्रस्तावास मंजुरी मिळावी यासाठी अमरावती विभागाचे शिक्षक आमदार श्रीकांत देशपांडे, पुणे विभागाचे आ.दत्तात्रय सावंत, शिक्षक सेनेचे प्रदेशाध्यक्ष ज. मो. अभ्यंकर, संघटनेचे अध्यक्ष कॉ. शरद संसारे, सरचिटणीस कॉ.जीवन सुरूडे, उपाध्यक्ष कॉ.अमोल दिघे, कॉ.पंकज रंधे, संतोष हीरुळकर,वैभव मोहड व रघुनाथ राठोड आदिंच्या शिष्टमंडळाने नुकतीच शास्त्री भवन नवी दिल्ली येथे मनुष्यबळ विकास मंत्र्यांची भेट घेतली
यावेळी झालेल्या चर्चेत संगणक शिक्षकांना मानधन तत्वावर सामावून घेण्याबाबत राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी पाठविलेल्या प्रस्तावाकडे देशपांडे यांनी जावडेकर यांचे लक्ष वेधले. त्यावेळी जावडेकर म्हणाले की, आम्ही महाराष्ट्र शासनाकडून विस्तृतपणे माहिती मागितलेली आहे. लवकरच महाराष्ट्र शासनाकडून माहिती उपलब्ध झाल्यावर आपल्या मानधन वरील प्रस्तावास मंजुरी देण्यात येईल. विस्तृत माहिती पाठविण्यासाठी शिक्षक आमदार राज्य शासनाकडे पाठपुरावा करणार आहे. यामुळे संगणक शिक्षकांमध्ये समाधानाचे वातावरण असून नवचैतन्य निर्माण झाले आहे. राज्यातील संगणक शिक्षकांनी श्रीकांत देशपांडे, दत्तात्रय सावंत, ज. मो. अभ्यंकर व संघटनेच्या पदाधिकार्यांचे आभार व्यक्त केले.