Breaking News

नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात 2 जवान शहीद


कांकेर - छत्तीसगढच्या पंखाजूरमधील परतापूर परिसरात पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत बीएसएफचे 2 जवान शहीद झाले असून 3 जवान जखमी झाले आहेत. बीएसएफचे जवान टेहळणीसाठी निघाले असताना दबा धरून बसलेल्या नक्षलवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला. मुक्तियार सिंग (हेड कॉन्स्टेबल) आणि लोकेंद्र (कॉन्स्टेबल) अशी शहीद झालेल्या जवानांची नावे आहेत. सुरक्षा रक्षक आणि नक्षलवाद्यांच्यात अजूनही चकमक सुरू असल्याचे पंखाजपूरचे पोलीस अधिकारी राजेन्द्र जयस्वाल यांनी सांगितले. जखमी जवानांना रायपूरच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. चकमक सुरू असल्याने बीएसएफची आणखी एक तुकडी घटनास्थळी दाखल झाली आहे. या भागात नक्षलवादी मोठ्या संख्येने असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरून शोधमोहिम राबवण्यात येत होती. टेहळणी करत असतानाच अचानक नक्षलवाद्यांनी जवानांच्यावर गोळीबार केला. गेल्या आठवड्यातच या भागातून 5 आईईडी बाँम्ब ताब्यात घेण्यात आले होते.