Breaking News

डेब्रीज घोटाळा चौकशीच्या पार्श्‍वभुमीवर समितीला पुरावे सादर

आ. चरणभाऊ वाघमारे- धनंजय चामलवार यांची बंद दरवाजाआड झाली चर्चा
मुंबई/विशेष प्रतिनिधी
मंत्रालय घोटाळ्याच्या चौकशीला वेग येऊन वास्तव अहवाल सादर व्हावा यासाठी आ. चरणभाऊ वाघमारे यांनी चौकशी अधिकारी मुंबई साबां दक्षता पथकाचे अधिक्षक अभियंता धनंजय चामलवार यांची भेट घेऊन पुराव्याकामी लोकमंथनसह अन्य काही वृत्तपत्रांच्या बातमीची कात्रणे आणि माहिती अधिकारात मिळालेली माहीती सादर केल्याने मनोरा आमदार निवास प्रमाणे डेब्रीज घोटाळा सिध्द होऊन संबंधितांवरील दोषारोप सिध्द होण्याची शक्यता वाढली आहे.

मंत्रालय डेब्रीज घोटाळ्याची चौकशी निष्पक्ष व्हावी आणि तत्कालीन संशयीत कार्यकारी अभियंता रणजीत हांडे आणि प्रज्ञा वाळके यांच्यावर ठेवलेला दोषारोप खरा असेल तर कायदेशीर कारवाई करून सजा व्हावी अथवा या आरोपांमध्ये तथ्य नसेल तर चौकशी अहवालात तसेचप्रमाण नमूद करून सादर होणे अपेक्षित आहे, तथापी गेल्या वर्षभरापासून चौकशी प्रक्रियेशी छेडछाड सुरू असल्याने प्रशासन कुठल्याही निष्कर्षापर्यंत पोहचू शकले नाही. या घोटाळ्याच्या चर्चेने अवघे साबां प्रशासन आणि मुख्यमंत्र्यांसह सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांचा पारदर्शक कारभार संशयाच्या गर्तेत सापडला आहे. सन 2014 ते सन 2017 या तीन आर्थिक वर्षात शहर इलाखा सार्वजनिक बांधकाम विभागाचे तत्कालीन कार्यकारी अभियंता रणजीत हांडे आणि प्रज्ञा वाळके यांनी मंत्रालय परिसरात झालेल्या कामासंदर्भात कागदी घोडे नाचवून करोडो रूपयांचा अपहार केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. आ. चरणभाऊ वाघमारे यांनी माहीती अधिकारात मिळवलेल्या दस्त ऐवजांवरून हा संशय खरा असल्याचा दावा करून मुख्यमंत्र्यांकडे चौकशीची मागाणी केली होती. या मागणीच्या अनुषंगाने मनोरा आमदार निवास इमारतीतील घोटाळ्याप्रमाणेच मंत्रालय डेब्रीज घोटाळ्याचीही चौकशी अधिक्षक अभियंता अरविंद सुर्यवंशी करीत आहेत. मनोरा आमदार निवास प्रकरणात धनंजय चामलवार यांनी चौकशी केल्यानंतर आरोपात तथ्य आढळून आल्याने कार्यकारी अभियंता प्रज्ञा वाळके आणि दोन सहअभियंत्यांना निलंबीत करण्यात आले. मनोरा घोटाळा चौकशी अहवालात घोटाळा नेमका किती रूपयांचा अपहार झाला याचा उल्लेख नसल्याने फौजदारी दाखल करता येत नसल्याचे प्रधान सचिव आशिषकुमार यांनी निदर्शनास आणून दिल्याचे आ. चरणभाऊ वाघमारे यांनी धनंजय चामलवार यांना सांगून इतर सहा घोटाळ्याच्या तक्रारी चौकशी अहवालात ही त्रुटी राहणार नाही, याची दक्षता घेण्यास सांगीतले. बंद दरवाजाआड आ. चरणभाऊ वाघमारे आणि धनंजय चामलवार यांच्या भेटीला मनोरा आमदार निवास घोटाळा चौकशी अहवालाच्या पार्श्‍वभूमीवर विशेष महत्व प्राप्त झाले असून धनंजय चामलवार यांच्या चौकशीतून तथ्य निश्‍चित बाहेर येण्याचे संकेत आहेत.