Breaking News

भालाफेकपटू नीरज चोप्राचा राष्ट्रीय विक्रम डायमंड लीगमध्ये ८७.४३ मीटर लांब भालाफेक

भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्रा याने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील ऐतिहासिक सुवर्णपदकानंतर दोहा येथे सुरू झालेल्या डायमंड लीग मैदानी स्पर्धेत विक्रमी घोडदौड कायम राखत ८७.४३ मीटर लांब भालाफेक करून स्वत:च्याच नावावर असलेला राष्ट्रीय विक्रम मोडला. त्याने २०१७च्या जागतिक अजिंक्यपद स्पध्रेतील रौप्यपदक विजेत्या जाकुब व्हॅडलेचला (चेक प्रजासत्ताक) पिछाडीवर टाकले. जाकुबला पाचव्या स्थानावर समाधान मानावे लागले. परंतु हे सर्व होत असताना नीरजला दहा खेळाडूंमध्ये चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले.

कनिष्ठ जागतिक स्पर्धेत नीरजने २०१६ मध्ये ८६.४८ मीटर भालाफेक करताना २० वर्षांखालील वयोगटात विश्वविक्रमाची नोंद केली होती आणि तो राष्ट्रीय विक्रम होता. हरयाणाच्या या खेळाडूने पहिल्या प्रयत्नात ८१.१७ मीटर अंतर गाठत समाधानकारक सुरुवात केली. मात्र, जागतिक विजेत्या जर्मनीच्या जोहानेस व्हेट्टरने ९१.५६ मीटर अंतर गाठताना आघाडी घेतली. त्यात ऑलिम्पिक विजेत्या थॉमर रोहलरने दुसऱ्या प्रयत्नात ९१.७८ मीटर अंतर पार करताना सुवर्णपदक निश्चित केले. जर्मनीच्याच आंद्रेस होफमनने ९०.०८ मीटरसह कांस्यपदक जिंकले, तर व्हेट्टरला रौप्यपदक पटकावण्यात यश आले.

राष्ट्रकुल स्पध्रेत ८६.४७ मीटर अंतर भालाफेक करून सुवर्णपदक जिंकणाऱ्या नीरजला तेव्हा राष्ट्रीय विक्रमाने हुलकावणी दिली होती. मात्र, त्याने ९० मीटरचे लक्ष्य डोळ्यासमोर ठेवताना प्रचंड मेहनत घेतली. त्यामुळेच त्याने कामगिरीत सुधारणा करत ८७ मीटर पलीकडे भाला फेकला. त्यामुळे जागतिक स्तरावर त्याच्याकडे प्रबळ दावेदार म्हणून पाहिले जात आहे. नीरज लंडन येथे होणाऱ्या डायमंड लीगच्या पुढील फेरीत सहभागी होणार आहे. तेथेही त्याला जर्मनीच्या खेळाडूंच्या आव्हानाचा सामना करावा लागणार आहे.