Breaking News

शैक्षणिक गुणवत्ता विकासासाठी ‘शिक्षणाची वारी’

 पुणे (प्रतिनिधी)। 30 - महाराष्ट्र शासन, शालेय शिक्षण विभाग आणि ‘श्यामची आई फौंडेशन’ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम’ अंतर्गत शिक्षणाची वारी हा अभिनव उपक्रम दिनांक 27 जानेवारी 2016 ते दिनांक 31 जानेवारी 2016 दरम्यान पुणे येथे आयोजिला आहे. सदर वारीचे उद्घाटन शालेय 
शिक्षण मंत्री श्री. विनोद तावडे यांच्या उपस्थितीत झाले.
ग्रामीण तसेच शहरी भागातील निम्न आर्थिक स्तरातील पालकांच्या मुलांच्या उत्तम दर्जाचे गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी जिल्हा परिषद शाळा व पालिका शाळा यांचे सक्षमीकरण ही काळाची गरज आहे. याच उद्देशाने जिल्हा परिषद शाळेतील प्रयोगशील शिक्षकांना प्रोत्साहन मिळावे, त्यांच्यापासून इतरांनी प्रेरित व्हावे यासाठी शिक्षणाची वारी आयोजिली आहे. शिक्षणाची वारीमध्ये एकूण 54 स्टॉल्स असून यात शिक्षणाच्या विविधांगी विकासाचे प्रदर्शन करण्यात आले आहे. कुमठे बीट मध्ये ज्ञानरचनावाद यशस्वीपणे राबविणार्‍या प्रतिभा भराडे, लोकसहभागातून धुळे जिल्ह्यात तब्बल दीड कोटी उभारण्याचे उपक्रम करणारे शिक्षक, इ-लर्निंग, कृतीयुक्त अध्यापन, क्रीडा, व्यवसाय शिक्षण, गुणवत्ता वाढ, संगीत, कला - कार्यानुभव, व्यवसाय समुपदेशन, मूल्यवर्धन, स्वच्छता समावेशित शिक्षण, भाषा अध्यापन, शिक्षक सहयोगी दल, पर्यावरणपूरक आदी विषयांची मांडणी करणारे स्टॉल्स आहेत. हे सर्व स्टॉल्स जिल्हा परिषदेच्या शाळेतील उपक्रमशील शिक्षकांचे तसेच शिक्षण क्षेत्रात विविध पातळ्यांवर कार्यरत असणार्‍या अशासकीय संस्थांचे आहेत. यात श्यामची आई फौंडेशन, भारतीय स्त्री शक्ती, पुनरुत्थान समरसता गुरुकुलम, विद्याभारतीची शिशुवाटिका, लेंड-अ-हँड इंडिया आदी संस्था सहभागी झाल्या आहेत.  महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांतून निवडक शिक्षक, अधिकारी या वारीत सहभागी होत आहेत. दररोज नऊ जिल्ह्यांतील 1,800 नवोपक्रमशील शिक्षक येत आहेत. पाच दिवसांत एकूण 7,500 शिक्षक आणि अधिकारी वर्ग वारीत सहभागी होणार आहेत.
सकाळी 10 ते 4 वाजेपर्यंत प्रदर्शन पाहण्यासाठी वेळ असून त्यानंतर दररोज खुली चर्चा घेण्यात येते.
रविवार, दिनांक 31 जानेवारी 2016 रोजी ‘शिक्षणाची वारी’च्या शेवटच्या दिवशी सकाळी 10 ते दुपारी 4 वाजेपर्यंत सर्वसामान्य नागरिकांसाठी प्रदर्शन खुले ठेवण्यात आले आहे. ‘शिक्षणाची वारी’चे कार्यक्रम स्थळ शिवछत्रपती क्रीडा संकुल, महाळुंगे - बालेवाडी, पुणे हे आहे. शिक्षणाची वारी मध्ये सहभागी होण्याचे आयोजकांतर्फे सर्वांना आवाहन करण्यात आले आहे.