अग्रलेख क्रीडाक्षेत्रासाठी सुवर्णकाळ...
देशभराची लोकसंख्या 127 कोटी असतांना, क्रीडा क्षेत्रातील विविध प्रकारांत आपल्याला पदके किती मिळतात? अशी कुचेष्टा केली जायची. मात्र अलीकडच्या काही वर्षांत भारतीय खेळाडूंनी क्रीडाक्षेत्रात केलेली दमदार कामगिरी ही नक्कीच कौतुकास्पद आहे. नुकत्याच ऑस्ट्रेलियामध्ये झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये भारतीय स्पर्धकांनी तब्बल 66 पदकांची लयलूट करत आपला दबदबा कायम राखला आहे. स्वातंत्र्योत्तर भारतात क्रीडा धोरणांकडे फारसे लक्ष दिले नाही, त्यात निधीची कमकरता. त्यामुळे खेळाडू घडवता आले नाही. तसेच क्रीडा क्षेत्रात करिअर करायचे, अशी मानसिकता रूजायला भरपूर वेळ लागला. त्यामुळे पदकांची नेहमीच वाणवा राहीली आहे. ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये तर नावालाच पदक असत. मात्र राष्टकुल स्पर्धांमुळे ऑलिम्पिक स्पर्धांतील दुष्काळ देखील संपण्याची शक्यता नाकारता येत नाही. या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताने 26 सुवर्ण, 20 रौप्य, आणि 20 क ास्यपदके जिंकली. भारताने दिल्लीतील राष्ट्रकुल स्पर्धामध्ये सर्वाधिक 101 पदके जिंकली होती. त्यानंतर मँचेस्टरमध्ये 69 आणि आता 66 पदकांची कमाई केली आहे. त्यामुळे यंदा पदकांची लयलूट कमी प्रमाणात झाली असे वाटत असले, तरी इतर खेळाडूंचा विचार केल्यास, त्यांना खूपच कमी फरकाने पराभूत व्हावे लागले आहे. असे असले, तरी देशात क्रीडाक्षेत्राबद्दल करिअर म्हणून विचार होवू लागला आहे. त्यामुळे भारतात आजचा काळ हा क्रीडाक्षेत्रासाठी सुवर्णकाळ आहे, असेच म्हणावे लागेल. आजचा काळ हा जरी क्रीडाक्षेत्रासाठी सुवर्णकाळ असला, तरी ही झेप येथेच थांबवता कामा नये. क्रीडाक्षेत्रात आमुलाग्र सुधारणा करण्याबरोबरच निधीची तरतूद देखील मोठया प्रमाणावर करण्याची गरज आहे. ग्रामीण भागात गुणवत्ता ठासून भरलेली आहे. फक्त त्या गुणवत्तेची कदर व्हायला हवी. त्यांना योग्य त्या सोयशी सुविधा मिळाल्या, तर ते जीवतोड मेहनत करून देशाचे नाव नक्कीच उंचावू शकतात. याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील कुस्तीपटू राहूल आवारेे. राहुल आवारे यांने बीड सारख्या ग्रामीण भागात राहून आपली कुस्तीची साधना अव्याहतपणे सुरू ठेवली. त्याचे फळ म्हणून कुस्तीत देशाला पहिले सुवर्ण राहुल आवारेच्या निमित्ताने भेटले. त्यामुळे ग्रामीण भागातील खेळाडूंचा शोध घेऊन, त्यांना प्रोत्साहन देण्याची खरी गरज आहे. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या पदकतालिकेत प्रथम क्रमांकावर ऑस्ट्रेलिया, दुसर्या क्रमांकावर ब्रिटन आणि तिसर्या क्रमांकावर भारत आहे. ही भारतासाठी जमेची बाजू असून, पुढील काळात ऑस्ट्रेलिया, ब्रिटनची ही मक्तेदारी मोडीत काढण्याची धमक आपल्या देशांत आहे. फक्त त्यासाठी काही बदल आपल्याला आपल्या क्रीडा धोरणांत करावे लागणार आहे. क्रिकेट सारख्या खेळाला आपण डोक्यावर घेऊन नाचतो, मात्र इतर खेळाकडे प्रामुख्याने लक्ष देत नाही. त्याचा परिणाम खेळाडूंवर देखील होत असतो. आपल्या खेळाला जर वलय नसेल, तर प्रोत्साहन भेटत नसल्याची भावना खेळाडूमध्ये निर्माण होते. त्यामुळे सर्वच क्रीडाप्रकारांना समान संधी देत, चांगल्या खेळाडूंचा शोध घेण्याची गरज आहे. कुस्तीत भारतीय कुस्तीपटूंनी दमदार कामगिरी केली. यात राहुल आवारे, विनेश फोगट, साक्षी मलिक, सुमित या कुस्तीपटूंचा प्रामुख्याने समावेश आहे.भारताने नेमबाजीत सर्वोत्कृष्ट कामगिरी केली आहे. नेमबाजीत भारताने 7 सुवर्णपदकांसह एकूण 16 पदके जिंकली. तेजस्विनी सावंत, जीतू राय, हीना सिद्धू, मनू भाकर, अनीश भानवाला, मेहुली घोष अशा अनुभवी नेमबाजांनी भारताला पदके जिंकून दिली आहेत. त्यांचे अभिनंदन केलेच पाहिजे, पण यातील सातत्य वाढवण्याची जबाबदारी शासनाने घ्यावी. वेट लिफ्टिंगमध्ये भारताने 9 पदके जिंकली. यात 5 सुवर्ण, 2 रौप्य आणि 2 कांस्यपदकांचा सामावेश आहे. मीराबाई चानू, संजीता चानू आणि पूनम यादव यांनी भारतासाठी सुवर्णपदके जिंकली. त्यामुळे येणार्या काळात क्रीडाक्षेत्रांचा आलेख चढता ठेवण्यासाठी सकारात्मक योजनांची गरज असून, ग्रामीण क्षेत्राला बुध्दीमत्तेला पुढे आणण्याची गरज होती.