Breaking News

शासकीय अधिकार्‍यांसह कर्मचार्‍यांच्या बदल्यांच्या धांदलीत कामाकडे दुर्लक्ष

सातारा, दि. 5 (प्रतिनिधी) : राज्य शासनाच्या अधिकार्‍यांसह कर्मचार्‍यांच्या बदल्यांचा घोळ सुरु झाल्यापासून शासकीय अधिकार्‍यांसह कर्मचार्‍यांनी कार्यालयीन कामाकडे दुर्लक्ष केल्याचे पहावयास मिळत आहे. बदलीस पात्र असलेला प्रत्येकजण कार्यालयीन कामापेक्षा सोयीच्या ठिकाणी बदली होण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे पहावयास मिळत आहे. 

दरवर्षी मे-जून महिन्यांमध्ये शासकीय कर्मचार्‍यांच्या बदल्या होतात. त्याचप्रमाणे गेल्या आठवड्यात सातारा जिल्ह्या परिषदेने ऑनलाईन बदल्यांच्या प्रक्रीया राबवून शिक्षकांच्या बदल्यांचे इंद्रधनुष्य पेलले. अर्थात त्या विरोधात काही ठराविक शिक्षक नेत्यांनी आवाज उठविला. सध्या तरी त्यांनी न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे. मात्र, जिल्हा प रिषदेच्या शिक्षण विभागाने त्याबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. याच कालावधीत जिल्हा परिषदेच्या प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी सौ. पुनीता गुरव ह्या लाच घेताना सापडल्या. त्यामुळे सोयींच्या बदल्यासाठीचे घोडेबाजार हवे त्या प्रमाणात रंगले नाहीत. आता त्यापाठोपाठ राज्य शासनाच्या कर्मचार्‍यांच्या बदल्याचा मौसम सुरु झाला आहे. त्यातल्या त्यात महसूल विभागातील बदल्या म्हणजे राजकारण्यांचे हक्काचे ठिकाण. यामध्ये राजकीय नेत्यांना नको असलेला अधिकारी त्याच्या भागातून इतरत्र घालवण्याचे काम केले जाते. 
यंदाच्या माहे मार्च-एप्रिल-मे महिन्यांमध्ये लोकसभा व विधानसभा निवडणूका असल्याने आपणाला अडचणी निर्माण करणारा अधिकारी आपल्या तालुक्यातून दुसर्‍या तालुक्यात घालवण्यासाठी नेत्यांनी आपले वजन महसूल मंत्र्यांकडे लावायला सुरुवात केली आहे. त्याबरोबरच अधिकार्‍यांनीही त्यांच्या ठरलेल्या ठिकाणी बदली मिळण्यासाठी आपापले हस्तक मंत्र्यांच्या दिमतीला पाठवायला सुरुवात केली आहे. 
जून महिन्याचा पहिला आठवडा असल्याने या आठवड्यात अधिकारी पोस्टींग मिळावे यासाठी धनलक्ष्मीचे वजन वापरू लागले आहेत. राजकारण्यांना धनलक्ष्मी लाभानंतरच पोस्टींगचा झेंडा फडकविण्यात येणार असल्याची चर्चा सुरु आहे. या चर्चेमध्ये मोठ-मोठी उड्डाने घेतल्याचे गौप्य स्फोट होवू लागले आहेत. यादरम्यान, संबंधित अधिकारी क ार्यालयीन कामापेक्षा सेटींगच्या कामात व्यस्त असल्याने कार्यालयात गैरहजर असल्याचे पहावयास मिळत आहेत.