Breaking News

व्यक्तिमत्व विकास कार्यशाळा उत्साहात


।संगमनेर/प्रतिनिधी।
नाशिक येथील अक्षरायन संस्था आणि संगमनेर महाविद्यालयातील वृत्तपत्र विद्या विभागाच्यावतीने ‘बोलू कौतुके’ ही दोन दिवसीय कार्यशाळा संगमनेर महाविद्यालयात मोठ्या उत्साहात पार पडली. कार्यशाळेचे उदघाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. के. देशमुख यांनी केले. 

यावेळी बोलताना प्राचार्य डॉ. देशमुख म्हणाले, अशा प्रकारच्या कार्यशाळा संगमनेरमधील विद्यार्थी व सर्व क्षेत्रांतील व्यावसायिकांसाठी सातत्याने घेतल्या गेल्या पाहिजे. अशा कार्यशाळांमधून विद्यार्थी व समाजाच्या मनावर चांगले संस्कार होत असतात. या कार्यशाळेत अपर्णा क्षेमकल्याणी आणि सुनिता तारापुरे यांनी सुत्रसंचालन, आवाज साधना, वाचीक अभिनय आणि संवाद कौशल्य अशा विविध विषयांवर मार्गदर्शन केले. विद्यार्थी, शिक्षक, पत्रकार, अभिनेते यांच्यासह विविध क्षेत्रात काम करणा-या व्यक्तींना व्यावसायिक कौशल्य आणि व्यक्तिमत्व विकासात योग्य दिशा मिळावी, यासाठी ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. संगमनेरसारख्या ग्रामीण शहरात अशा प्रकारच्या कार्यशाळेचे आयोजन पहिल्यांदाच करण्यात आले होते. प्रारंभी मनिषा उगले यांनी प्रास्ताविक केले. कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी प्रा. नम्रता पवार, प्रा. सुशांत सातपुते, डॉ. संतोष खेडलेकर, ललित देशमुख यांनी परिश्रम घेतले. प्रा. सुशांत सातपुते यांनी आभार मानले.