Breaking News

गुलाबपुष्प हारात सबज्याऐवजी ‘कडू’ पाल्याचा वापर शिर्डीत भक्तांना लागतोय चुना



शिर्डी/किशोर पाटणी 

साई शताब्दीला १०० वर्ष पूर्ण होत असताना साईभक्तांमध्ये शिर्डीत येण्यासाठी व साईबाबांच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणावर वाढ होताना दिसून येत आहे. साईभक्तांमध्ये साईबाबांच्या समाधीवर गुलाब पुष्पहार, बुके चढविण्यात साईभक्तांना मोठे समाधान मिळते. मात्र या व्यवसायात काही अप्रवृत्ती घुसल्या आहेत. आर्थिक फायद्यासाठी सुगंध असलेल्या सबज्याचा वापर करण्याऐवजी हे महाभाग पाटाच्या कडेला असलेल्या शिरसाच्या झाडाचा पाला मोठ्या प्रमाणावर वापरत आहेत. मोठ्या श्रद्धा आणि सबुरीने येथे येत असलेल्या साई भक्तांना मात्र चुना लावायचे काम येथे राजरोसपणे सुरु आहे. 

राहाता तालुक्यातील गुलाब शेती व सबज्याची शेती करणाऱ्या जवळपास दहा गावांतील शेतकऱ्यांना या अपप्रवृत्तीमुळे मनस्ताप होत आहे. साईंच्या शिर्डीत फसवणुकीचे अनेक प्रकार लोकांनी पाहिले, भक्तांनीदेखील अनुभवले. मात्र या प्रकारे होणाऱ्या फसवणुकीला साईबाबा संस्थान आणि वनखात्याने अशा अपप्रवृत्ती असलेल्या लोकांविरुद्ध कारवाई करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याची मागणी जोर धरू लागली आहे. गुलाबपुष्प आणि हार व्यवसायात राजरोसपणे सुरु असलेला हा प्रकार धक्कादायक आणि संतापजनक आहे. सबज्याच्या नावाखाली कडू झाडाचा पाला लावून सुरु असलेल्या या गैरप्रकाराला सुरक्षा रक्षकांचेदेखील अभय मिळते आहे. केवळ पाला विकून महिन्याला लाखो रुपये कमविणारी ही टोळी या परिसरातील शेतकऱ्यांच्या गुलाबपुष्प आणि सबज्या विकणाऱ्या अनेक कुटुंबांना कर्जाच्या गर्तेत ढकलत आहे. निघोज, निमगाव, कनकुरी, नांदुर्खी, कोऱ्हाळे, डोऱ्हाळे, अस्तगाव, चोळकेवाडी, पिंपळवाडी, रुई अशा शिर्डीलगत असलेल्या गावात तत्कालीन कृषिमंत्री आणि सध्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी फळबागा आणि गुलाब शेतीला प्रोत्साहन दिले होते. शेतकऱ्यांचे हित डोळ्यासमोर होते एक एकर सबज्याची लागवड केली तर शेतकऱ्याला वर्षाकाठी लाखभर रुपये उत्पन्न मिळेल, हा हेतू त्यामागे होता. हार दुकानदार व गुलाब विक्री करणारे हे खरे विक्रेते. शिर्डीत गुलाब विक्री करणारे अनेक तरुण शिर्डीत आहेत. महागडे गुलाबपुष्प व बुकेसाठी सबज्याचा पाला वापरण्याऐवजी काहींनी यावर अफलातून उपाय शोधला आहे. मात्र हा उपाय या परिसरातील शेतकऱ्यांना उध्वस्त करणारा ठरू पाहत आहे. 

साईभक्तांच्या फसवणुकीकडे साई संस्थान, पोलीस, वनखाते यांनी या प्रकाराला बंदी घालावी, अशी मागणी होत आहे. साईभक्तांची फसवणूक करणाऱ्या लोकांवर कारवाई करण्यासाठी आता शेतकऱ्यांनीच पुढाकार घेतल्याचे चित्र दिसून येत आहे. यासंदर्भात काही शेतकरी थेट राधाकृष्ण विखे, डॉ. सुजय विखे, जिल्हा पोलीस प्रमुख रंजनकुमार शर्मा, साईसंस्थानच्या कार्यकारी अधिकारी रुबल गुप्ता, सुरक्षा अधिकारी आनंद भोईटे, उपविभागीय अधिकारी सागर पाटील यांची भेट घेऊन कारवाईची आहेत. येथील शेतकरी बाबासाहेब लांडगे, रमेश गाडेकर, सुनील गाडेकर, स्वप्नील गाडेकर, राजेंद्र गाडेकर, दशरथ गाडेकर, संजय गाडेकर, भाऊसाहेब कापसे आदींनी एका निवेदनाद्वारे या अपप्रवृत्तींविरुद्ध आवाज उठविण्याचा निर्धार केला आहे.

चौकट 

कमी श्रमात महिन्याला लाखो रुपये 

या व्यवसायावर राहाता तालुक्यातील अनेक शेतकरी अवलंबून आहेत. मात्र काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी चक्क पाटाच्या कडेला व रस्त्याच्या कडेला असलेल्या कडू झाडाचा पाला या फुलांच्या खाली लावण्याचा सपाटाच सुरु केला आहे. सामान्य भक्ताला यातला फरक समजत नाही. मात्र सुरक्षा रक्षकांना माहित असूनही ते लक्ष देत नाही आणि साईसंस्थानदेखील त्यांच्याविरुद्ध कठोर कारवाई करत नाही. कमी श्रमात पैसे कमविणारी ही टोळी सध्या राजरोसपणे दर महिन्याला लाखो रुपये कमवत आहे.

चौकट

… तर ‘त्या’ तरुणांविरुद्ध कठोर कारवाई

शिर्डीत वर्षाकाठी काही कोटी भाविक दर्शनासाठी येतात. साईभक्त गुलाबपुष्प, बुके, हार समाधीसाठी खरेदी करतात. त्यात सुगंधी सबज्याच्या वापर होतो. त्यावर भक्तांचा विश्वास आहे. मात्र जर कोणी त्याऐवजी कडू पाला अथवा शिरसाचा पाला वापरत असेल त्यातून भक्तांची फसवणूक होत असेल तर असा प्रकार सहन केला जाणार नाही. साईभक्तांचाही फसवणूक करणाऱ्या तरुणांविरुद्ध वेळप्रसंगी कायद्याच्या अधीन राहून कठोर कारवाई केली जाईल. 

आनंद भोईटे, पोलीस उपाधिक्षक, साईसंस्थान शिर्डी.