Breaking News

भिडेंचे ‘ते’ वक्तव्य अंधश्रद्धा कायद्यानुसार गुन्हा : अंनिस

पुणे - माझ्या शेतातील आंब्याच्या झाडाचे आंबे खाल्ले की जोडप्यांना मुले होतात, असे बेताल वक्तव्य करणार्‍या संभाजी भिडे यांच्यावर अंधश्रद्धा निर्मूलन समितीने जोरदार टीका केली आहे. संभाजी भिडे गुरुजींनी केलेले वक्तव्य हे अंधश्रद्धा कायद्यानुसार चमत्काराचा दावा करणारे असून या कायद्यानुसार हा गुन्हा आहे, अशी प्रतिक्रिया अंनिसकडून व्यक्त करण्यात आली आहे. ही सर्व शिकलेली मंडळी आहेत तरीही त्यांच्याकडून अवैज्ञानिक गोष्टी बोलल्या जात आहेत. शाळेत न गेलेल्या संत तुकारामांनी ही 350 वर्षापूर्वी वैज्ञानिक दृष्टीकोन मांडला होता. आजही अनेक वारकरी हा संदेश देत आहेत. मात्र, भिडे गुरुजींनी केलेल्या विधानाचा धारकर्‍यांनीही विचार करायला हवा, की हे आपल्याला कुठे घेऊन जात आहेत. माझ्या शेतातला आंबा खाल्ला तर जोडप्यांना अपत्यप्राप्ती होते. आजपर्यंत 180 जोडप्यांनी हा आंबा खाल्ला असून, त्यापैकी दीडशे जोडप्यांना अपत्यप्राप्ती झाल्याचा अजब दावा संभाजी भिडे गुरुजींनी नाशिकमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात भाषणादरम्यान केला होता. या वक्तव्यामुळे सर्वत्र आश्‍चर्य व्यक्त होत आहे.