Breaking News

मुंबई विद्यापीठाचे रत्नागिरी उपकेंद्र सक्षम करण्याबाबत शिक्षणमंत्र्यांना निवेदन

रत्नागिरी, - मुंबई विद्यापीठाचे रत्नागिरी येथील उपकेंद्र सक्षम करण्याबाबतचे निवेदन उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांना अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे नुकतेच रत्नागिरीत देण्यात आले. अभाविपतर्फे निवेदनाद्वारे ही माहिती देण्यात आली.

शिक्षणाची वारी उपक्रमाच्या उद्घाटनाकरिता श्री. तावडे नुकतेच रत्नागिरीत आले होते. त्यावेळी त्यांना अभाविपतर्फे निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, भारतीय समाजाला शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी 1857 साली मुंबई विद्यापिठाची स्थापना झाली. विद्यापीठाला 160 पेक्षा जास्त वर्षे झाली, तरी विद्यापीठाचें नाव भारतातील पहिल्या 100 विद्यापीठांच्या यादीतसुद्धा दिसत नाही. भारतातील पहिले विद्यापीठ या नात्याने मुंबई विद्यापीठाला मानाचे स्थान मिळायला हवे होते. पण तसे होत नाही. विद्यापीठात सध्या 700 पेक्षा अधिक महाविद्यालये समाविष्ट आहेत. त्यामुळे वाढत्या कार्याला अधिक वाव मिळावा यासाठी विद्यापीठाने उपकेंद्रांची निर्मिती केली. रत्नागिरीतही असे उपकेंद्र आहे. मात्र ते सक्षम झालेले नाही. रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील विद्यार्थ्यांना परीक्षा विषयातील बाबींसाठी मुंबईत जावे लागते. त्यामुळे या उपकेंद्राचा उपयोग होत नाही. त्यामुळे उपकेंद्रांमध्ये प्रभारी कुलगुरूंची नियुक्ती करावी, मुंबई विद्यापीठामध्ये शिकविले जाणारे सर्व कोर्सेस उपकेंद्रामध्ये शिकविले जावेत, प्रशासकीय यंत्रणा मुंबई विद्यापीठाप्रमाणेच अद्ययावत करावी, उपकेंद्रामध्ये बेसिक इंटरनेट सुविधा उपलब्ध व्हावी, परीक्षा विभागातील व्यवस्थापन उपकेंद्रातून व्हावे, कोकणातील विद्यार्थ्यांचे प्रश्‍न आणि होणारा त्रास विशेष लक्ष घालून सोडवावा, अशी मागणी करण्यात आली आहे.