Breaking News

रत्नागिरी जिल्ह्यातील 44 धरणे भरली

रत्नागिरी, दि. 01, ऑक्टोबर - रत्नागिरी जिल्ह्यात सप्टेंबरअखेरपर्यंत सरासरी 3 हजार 325 मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून जिल्ह्यातील सर्वच पाणीसाठे  तुडुंब भरले आहेत. तलाव, विहिरी तसेच काही धरणे 100 टक्के भरली असून जिल्ह्यातील 63 धरणांपैकी 44 धरणे शंभर टक्के भरली आहेत.
गेल्यावर्षीपेक्षा यावर्षी जिल्ह्यात सुमारे 600 मिलिमीटर पाऊस कमी झाला आहे. मात्र, तरीसुद्धा जिल्ह्यातील पाणीसाठ्याची स्थिती चांगली आहे. तसेच यावर्षी  जिल्ह्यातील सर्वच धरणांमध्ये आता 80 टक्क्यांपेक्षा अधिक पाणीसाठा आहे. रत्नागिरी जिल्ह्यात 63 पैकी 60 लघुपाटबंधारे प्रकल्प आहेत. तर 3 मध्यम पाटबंधारे  प्रकल्प आहेत. खेड तालुक्यात एक व राजापूर तालुक्यात एक आणि संगमेश्‍वर तालुक्यात एक असे तीन मध्यम पाटबंधारे प्रकल्प आहेत. लघुपाटबंधारे विभागाच्या  63 पैकी 44 धरणे तुडुंब, तर 6 धरणे 90 टक्के भरली आहेत. अन्य 11 धरणे 80 टक्क्यांपेक्षा जास्त भरली आहेत. त्यामुळे राज्याच्या तुलनेत कोकणातील  पाणीसाठा चांगला आहे.