अग्रलेख भाजपचा घसरता आलेख !
सोळाव्या लोकसभा निवडणूकींच्या वेळी भाजपाकडून विशेषत: नरेंद्र मोदी यांच्याकडून करण्यात आलेला प्रसार हा संपूर्ण भारतीयांसाठी आशा जागवणारा होता, त्यामुळे देशातील जनतेला भाजपला भरभरून मतदान केले, आणि भाजपा सत्तेवर आली. मात्र केंद्रसरकारच्या या चार वर्षांच्या कालावधीमध्ये जनतेने भाजपाचा कारभार पाहिला, आणि त्यांची घोर निराशा झाली. कारण प्रशासनांवर नसलेला वचक, सर्वसामान्यांचे कामे होत नसल्याची ओरड, चुकीचे निर्णय घेण्याची पध्दत यामुळे सर्वसामान्य जनता होरपळून निघाली आहे. त्यामुळे भाजपच्या क ार्यपध्दतीवर ती टीका करतांना दिसून येत आहे. भाजप खासदारांचे रिपोर्टकार्ड देखील चांगल्या प्रगतीचे नसल्यामुळे भाजप व संघाच्या गोटात देखील धास्ती निर्माण झाली आहे. एकीकडे भाजप एक-एक राज्य जिंकत निघाले होते, मात्र गुजरात विधानसभा निवडणूकींपासून भाजपच्या प्रगतीचा आलेख हा उतरता राहिला आहे. पोटनिवडणूकांमध्ये तर भाजपाची धुळधाण झाल्याचे चित्र आहे. सतराव्या लोकसभेला सामौरे जाण्यासाठी भाजपकडे किमान एक वर्षांचा कालावधी उरला आहे. मात्र याचदरम्यान भाजपाने पुन्हा एकदा लोकसभेच्या निवडणूकीसाठी रणनिती आखण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. मात्र सत्तेत असल्यामुळे भाजपला जनतेच्या रोषांचा सामना करावा लागत आहे.
त्यामुळे मोदी लाटेची पीछेहाट होण्यास सुरूवात झाली आहे. अच्छे दिन कुठे आहे, असा सवाल सर्वसामान्य जनता करत आहे. काळे धन कुठे आहे, आमच्या खात्यात पंधरा लाख रूपये कधी जमा होणार असे अनेक प्रश्न सर्वसामान्य जनता आता उपस्थित करत आहे. सर्वसामान्य माणून आपली व्यथा मांडताना दिसून येत आहे. यासर्व कारणांमुळे भाजपची मतांची टक्केवारीचा आलेख घसरत चालला आहे. त्यामुळे भाजपच्या गोटात शांतता पसरली असून, 2019 च्या लोकसभा निवडणूकांना सामोरे जाण्यापूर्वी रणनितीत बदल करून, भाजपचा जनाधार वाढ विण्याची मोठी जवाबदारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर असेल. तर दुसरीकडे समविचारी पक्षांची मोट बांधून 2019 च्या निवडणूकांना सामोरे जाण्याचे आव्हान काँगे्रससमोर असणार आहे. तर दुसरीकडे भाजपाच्या गोटातून मित्रपक्ष दुरावतांना दिसून येत आहे. तेलगु देसमसह अनेक पक्ष भाजपांच्या विरोधात जातांना दिसून येत आहे. भाजपच्या खालावलेल्या आलेखामुळे भाजपची मातृसंस्था असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या गोटात खळबळ उडाली आहे. त्यामुळे 2019 मध्ये लोकसभेच्या विद्यमान खासदारांचे तिकिट मोठया प्रमाणात कापण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. भाजपाने हा निर्णय जरी पुढील रणनिती ठरवत स्वीकारला तरी, यातून भाजपाला बंडखोरीचा सामना मोठया प्रमाणात करावा लागू शकतो. उत्तरप्रदेशात मोठया प्रमाणात भाजपाचे खासदार निवडून आलेले आहेत, मात्र सध्याचे चित्र संपूर्ण वेगळे असून, उत्तरप्रदेशात भाजपला नामुष्कीचा सामना करावा लागु शकतो. त्यामुळे उत्तरप्रदेशात नेतृत्वबदल करण्याची गरज निर्माण झालेली आहे. देशातील अनेक राज्ये जरी भाजपच्या ताब्यात असली तरी तेथील आमदार, खासदारांना स्वतंत्र निर्णय घेता येत नाही. त्यामुळे विकासकामे करतांना त्यांची गोची झालेली आहे. त्यामुळे प्रचार आणि प्रसार तरी कसा करावा असा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. त्यामुळे पुढील निवडणूकां भाजपसमोर नक्कीच सोप्या नाहीत, हे भाजपच्या उतरत्या आलेखावरून स्पष्ट होत आहे.