Breaking News

रस्त्यांच्या कामांत प्रचंड गैरव्यवहार न्यायालयात जाणार : शेलार


श्रीगोंदा प्रतिनिधी 

शहरातील १७ रस्त्यांच्या कामांत मोठी अनियमितता असून या कामात प्रचंड गैरव्यवहार होत आहे. टेंडरमधील रस्त्यांच्या मंजूर लांबी, रुंदीपेक्षा प्रत्यक्षात रस्त्यांची कामे करताना या रस्त्यांची लांबी, रुंदी कमी करण्याचे ‘पाप’ श्रीगोंदा नगरपरिषदेकडून सुरू आहे. या १७ रस्त्यांच्या कामांत झालेल्या गैरकारभाराच्या विरोधात जिल्हाअधिकाऱयांकडे तक्रार करून सर्व प्रकरणाची चौकशी करुन दोषींवर कारवाई करण्याची मागणी करणार आहोत. मात्र तिथे दाद न मिळाल्यास न्यायालयात जाणार आहोत, अशी माहिती शिवसेना जिल्हा समनवयक घनश्याम शेलार यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

ते म्हणाले, शहरात सुरू असणाऱ्या १७ रस्त्यांच्या कामांपैकी ज्या १२ रस्त्यांची कामे पूर्ण झालेली आहेत, त्याठिकाणी जाऊन टेप लावून त्या रस्त्यांची लांबी रुंदी मोजण्यात आली. परंतु सर्वच रस्ते हे टेंडरमधील मंजूर लांबी रुंदीपेक्षा कमी भरले. या रस्त्यांच्या कामांच्या अनियमिततेबद्दल शिवसेनेची भूमिका मांडण्यासाठी शेलार यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना शेलार म्हणाले, शनिचौक ते जोधपूर मारुती चौक या रस्त्याची लांबीच मुळात ५०० मीटर आहे. परंतु श्रीगोंदा नगरपरिषदेने याच रस्त्याचे टेंडर १२०० मीटर लांबीच्या अंतराचे काढले आहे. हा प्रकार म्हणजे ‘जिल्ह्यापेक्षा तालुका मोठा’ असा आहे. सरासरी १७ रस्त्यांपैकी १२ रस्त्यांची कामे पूर्ण झालेली आहेत. या बारा रस्त्यांच्या लांबीत २५% तर रुंदीत ३० ते ५०% कपात केली असल्याचे निष्पन्न झाले आहे. पैसे तर पूर्ण मंजूर टेंडरमधील लांबी, रुंदीप्रमाणे अदा केले जाणार आहेत. मग रस्त्यांच्या मापात पाप करण्याचे कारण काय, याबाबत आपण श्रीगोंदा नगरपरिषदेचे मुख्याधिकार्याना विचारले. मात्र त्यांनीदेखील समाधानकारक उत्तर दिले नाही. पत्रकार परिषदेला तालुकाप्रमुख संजय आनंदकर, सुनीता हिरडे, भाऊसाहेब गोरे, प्रकाश निंभोरे आदींसह शिवसैनिक उपस्थित होते. 

चौकट

माजीमंत्र्यांना वाचविण्यासाठी आटापिटा श्रीगोंदयातील माजीमंत्री बबनराव पाचपुते यांचे माऊली निवासस्थानाचे अतिक्रमण वाचवण्यासाठी श्रीगोंदा नगरपरिषदेने वडाळी रस्त्यावरील पोलिसांची जुनी शासकीय वसाहत पाडण्याची पत्राद्वारे मागणी केली. त्याबाजूने रस्ता करून माजीमंत्र्यांचे अतिक्रमण वाचविण्यासाठीच हा आटापिटा आहे. नगरपालिकेचा या शासकीय जागेत घुसण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे शेलार म्हणाले.