Breaking News

पुण्यातील 74 वर्षीय आजीबाईंनी सर केले आफ्रिका खंडातील सर्वोच्च शिखर

पुणे, दि. 18, ऑक्टोबर - पुणे शहरातील गिर्यारोहक संस्था गिरिप्रेमीच्या संस्थापिका अध्यक्षा उषःप्रभा पागे यांनी कुटुंबियासह वयाच्या 74 व्या वर्षी आफ्रिका खंडातील सर्वात उंच  शिखरावरील मोहीम यशस्वी केली. टांझानिया देशातील ‘माउंट किलीमांजारो’ या 5895 मीटर उंच शिखरावर चढाई केली. यावेळी त्यांचा मुलगा नवेंदू व मुलगी गिरीजा हे देखील  त्यांच्यासोबत होते.गिर्यारोहक असलेल्या 74 वर्षीय उषःप्रभा गेल्या चाळीस वर्षाहून अधिक काळ गिर्यारोहण करत आहेत. त्यांच्या पुढील पिढीने देखील गिर्यारोहणाचा वारसा  समर्थपणे पुढे चालविण्याचा वसा घेतला असून सहकुटुंब ‘माउंट किलीमांजारो’ सारख्या शिखरांवरील चढाई हा त्याचाच भाग आहे.‘माउंट किलीमांजारो’ हे आफ्रिका खंडातील सर्वात  उंच शिखर असून जगभरातील गिर्यारोहकांमध्ये प्रसिद्ध आहे. टांझानियातील किलीमांजारो अभयारण्य परिसरातून ट्रेक करत या शिखरावर चढावे लागते. हे शिखर हे एका सुप्त  ज्वालामुखीचा भाग असून गेल्या 10 वर्षाहून अधिक काळ या ज्वालामुखीचा उद्रेक झालेला नाही. म्हणूनच या शिखराची रचना ज्वालामुखीसारखी दिसते. या अजब संरचनेमुळे  देखील ‘माउंट किलीमांजारो’ प्रसिद्ध आहे.