Breaking News

फिफा मैत्रीपूर्ण सामने: ऑस्ट्रियाची जर्मनीवर मात


ऑस्ट्रिया वृत्तसंस्था

फिफा फुटबॉल वर्ल्ड कप सामान्यांच्या पूर्वंधर्तीवर आयोजित मैत्रीपूर्ण सामन्यात ऑस्ट्रियाने जर्मनीवर मात केली. रविवारी झालेल्या या सामन्यात जर्मनीला ऑस्ट्रियाकडून १-२ असा पराभव पत्करावा लागला. जर्मनीचा कर्णधार व गोलरक्षक मॅन्युएल न्युएर याने या सामन्याद्वारे आपला फिटनेस सिद्ध केला असला, तरी ऑस्ट्रियाचे आक्रमण रोखण्यात त्याला यश आले नाही. क्लॅगेनफर्टला रंगलेला हा सामना पावसामुळे रद्द होण्याची भीती होती. मात्र, पाऊस थांबल्यानंतर सुमारे १ तास ४० मिनिटे उशीरा हा सामना सुरू करण्यात आला. सामन्याच्या पूर्वार्धात अकराव्या मिनिटासच मेसट ओझिलने गोल करून जर्मनीला आघाडी मिळवून दिली होती. ही आघाडी जर्मनीने मध्यंतरापर्यंत टिकवून ठेवली. उत्तरार्धात मात्र, जर्मनीचे सामन्यावरील नियंत्रण सुटले. ५३ व्या मिनिटास हिंटेरेगरने कॉर्नरवरून चेंडू थेट गोलजाळ्यात धाडून ऑस्ट्रियाला बरोबरी साधून दिली. त्यानंतर अलेझांड्रो शॉफने सत्तराव्या मिनिटास ऑस्ट्रियाचा दुसरा गोल नोंदवून त्यांना आघाडीवर पोहचवले. ही आघाडी भेदण्यात जर्मनीला अखेरपर्यंत यश आले नाही. या विजयामुळे ऑस्ट्रियाला तब्बल ३२ वर्षांनी जर्मनीला पराभूत करण्यात यश आले.