Breaking News

जैन समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

जामखेड / ता.प्रतिनिधी । 

अखिल भारतीय जैन कॉन्फरन्स दिल्ली (चतुर्थझोन) च्यावतीने जामखेड येथील जैन समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष तहसिलदार विशाल नाईकवडे, प्रमुख पाहुणे पोलीस नि. पांडुरंग पवार, जैन कॉन्फरन्सचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य संजय कोठारी 
जामखेड येथील 10 वीमध्ये चांगले गुण संपादित करून आपल्या गावाचे तसेच आई-वडील यांचे नाव उंचावणार्‍या विद्यार्थ्यांचा सत्कार जैन कॉन्फरन्सच्या वतीने करण्यात आला. सालाबादप्रमाणे कोठारी प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय कोठारी यांनी आपल्या निवासस्थानी हा कार्यक्रम आयोजित केला. यावेळी ’ लब्धी बोरा ’(90.60 टक्के), रिद्धी भंडारी (87.80 टक्के), रोनीत बाफना ( 91 टक्के), साक्षी गांधी (82.40 टक्के), सार्थक बोरा (91 टक्के), खुशी बोथरा (89 टक्के), तनुज कासवा या सर्व गुणवंताचा सत्कार जामखेड येथील तहसीलदार विशाल नाईकवडे व पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी तहसीलदार म्हणाले की, मी चार दिवसांपुर्वीच जामखेड येथे आलो आहे. मला संजय कोठारींच्या समाजकार्याबद्दल माहिती झाले. तसेच त्यांनी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. ज्यांना कमी मार्क मिळाले, त्यांनी खचून न जाता अजून जास्त अभ्यास करून मार्क्स चांगले मिळवण्यासाठी प्रयत्न करावे, आणि आयुष्यात एक ध्येय गाठण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करत राहावे. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे जामखेडचे पो.नि. पांडुरंग पवार म्हणाले की, जैन कॉन्फरन्स आणि कोठारी प्रतिष्ठानचे नाव मी ऐकून होतो, संजय कोठारी यांचा पहिल्याच दिवशी अपघातातील जखमींना मदत करतांना आम्हास अनुभव आला. आज ते प्रत्यक्ष पाहण्याचा व त्या कार्यक्रमाचा एक भाग होण्याचा आम्हास योग आला. विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांना प्रोत्साहन देणे आवश्यक आहे, त्यामुळे ते अजून मेहनत करतील अशी अपेक्षा आहे. 10 वीमध्ये पास झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी संजय कोठारी, गणेश भळगट, पिंटू बोरा, प्रशांत बोरा, सुमतीलाल बोथरा, रसिकलाल बोथरा, सुमित चानोदिया, नितीन सोळंकी, अभय बोरा, वृषभ भंडारी, रोहन कोठारी हे उपस्थित होते.