वाळूतस्करांचा तहसीलदारांच्या पथकावर प्राणघातक हल्ला
राहुरी विशेष प्रतिनिधी
तालुक्यातील चिखलठाण येथील मुळा नदीपात्रात वाळूतस्करावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या तहसीलदार अनिल दौंडे यांच्यासह पोलिस कर्मचारयाची बंदूक हिसकावत कर्मचारी व तलाठ्यावर वाळूतस्करांनी प्राणघातक हल्ला केला. शनिवारी {दि. ९ } सायंकाळी ७ च्या सुमारास ही घटना घडली. वाळूतस्करांनी तीन जेसीबी, दोन ट्रक्टर, दोन डंपर, व डंपरमधील ११ ब्रास वाळू असा सुमारे ९८ लाख ७५ हजारांचा मुद्देमाल तहसीलदार दौंडे यांच्यासमोरुन पळवून नेला.
राहुरी तालुक्यातील मुळा व प्रवरानदीपात्रात वाळूतस्करांचा उच्छाद सुरुच आहे. एकाच वेळेस चक्क तहसीलदार, पोलिस कर्मचारी व तलाठ्यावर हल्ला करण्याची घटना येथे घडली. त्यामुळे वाळूतस्करीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. याप्रकरणी राहुरी पोलिस ठाण्यात १९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
याप्रकरणी कामगार तलाठी परते यांनी फिर्याद दिली. शासनाच्या मालकीची वाळू उपसा करणाऱ्यांविरुद्ध कारवाईसाठी महसूल कर्मचारी व पोलिस कर्मचारी गेले हा हल्ला करण्यात आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणे, शासकीय कामात आडथळा आणणे, शासनाच्या ताब्यातील वाहने पळवून नेणे, गैरकायद्याची मंडळी जमवून दहशत निर्माण करणे, सरकारी कर्मचारयांना मारहाण करणे, शासकीय मालमत्तेचे नुकसान करणे, पर्यवरणास धोका निर्माण करणे आदी विविध कलमांनुसार राहुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास पोलिस उपधिक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरिक्षक अविनाश शिळीमकर करत आहेत.