Breaking News

शिवप्रेमींनी भर पावसात केला हरिहर गड सर

अकोले तालुक्यातील मेहेंदुरी येथील वाघोबा युवा प्रतिष्ठान च्या शिवप्रेमींनी राजमाता जिजाऊ यांच्या स्मृतीदिनानिमित्त नाशिक जिल्ह्यातील कठीण असलेला हर्षगड (हरिहर) हा किल्ला भर पावसात सर केला. सदर मोहीम वाघोबा प्रतिष्ठाणचे सदस्य बबन शिंदे व प्रशांत आरोटे यांच्या नेतृत्वाखाली यशस्वी करण्यात आली. किल्यामध्ये शिवकालीन वास्तू पाहून त्याचे पावित्र्य राखत किल्ल्याची माहिती घेतली. तसेच पुरातन वास्तूंचीही माहिती घेण्यात आली. या किल्ल्यावर येताना काही ठिकाणी किल्ल्याच्या कातळ भिंतीपाशी पोहोचतो. या कातळात पायर्‍या खोदलेल्या आहेत. जागोजागी आधारासाठी खोबण्यादेखील केलेल्या आहेत. या पायर्‍या चढून गेल्यावर समोरच एक दरवाजा लागतो. पुढे डोंगरांची एक कपार आहे. येथून चालत पुढे गेल्यानंतर पुन्हा काही पायर्‍या लागतात. या पायर्‍या चढून गेल्यानंतर आपण किल्ल्याच्या मुख्य द्वारापाशी पोहोचतो. या द्वारातून आतमध्ये गेल्यावर आपण किल्ल्याच्या पठारावर पोहोचतो. किल्ल्याचे पठार तसे निमुळतेच आहे. मध्येच एक उंचवटा आलेला आहे. पायवाटेने थोडेसे पुढे गेल्यावर डावीकडे खाली कड्यात एक गुप्त दरवाजा आढळतो, मात्र तेथे जाण्याचा मार्ग सद्यस्तिथीला अस्तित्वात नाही. थोडे पुढे गेल्यावर हनुमानाचे आणि शंकराचे छोटेसे मंदिर आहे. समोरच पाण्याचा मोठा तलाव असून, तलावातील पाणी पिण्यास योग्य आहे. थोडे पुढे गेल्यावर एक इमारत आढळते. या इमारतीत दोन खोल्या आहेत. या इमारतीमध्ये 10 ते 12 जणांना राहता येते. इमारतीच्या एका बाजूला 5 पाण्याची टाकी आहेत. यातील एका टाक्यातील पाणी पिण्यासाठी योग्य आहे. गडाचा घेरा अतिशय निमुळता असल्याने एक तासात गड फेरी आटोपता येते. सदर किल्याची माहिती सागर आरोटे, बबन शिंदे, उमेश फरगडे, धनंजय आरोटे, रविराज बंगाळ, संतोष चासकर, मनोज कानवडे, भूषण आरोटे, अमोल शिंदे, प्रशांत आरोटे आदींनी किल्ल्याची माहिती घेत, भर पावसात हा किल्ला सर केला.