भारताबाहेरील 5 खंडातील 30 शहरात ’ग्लोबल पुलोत्सव’
पुणे, पु. ल. देशपांडे यांच्या 8 नोव्हेंबर 2018 ते 8 नोव्हेंबर 2019 या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधत पु.ल. परिवार आणि आशय सांस्कृतिकच्या वतीने भारतातील 20 शहरात आणि भारताबाहेरील 5 खंडातील 30 शहरात ’ग्लोबल पुलोत्सव’ साजरा करण्यात येणार आहे, अशी माहिती आशय सांस्कृतिकचे वीरेंद्र चित्राव यांनी दिली. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक द. मा. मिरासदार, सतीश जकातदार, पुण्यभूषण प्रतिष्ठानचे डॉ. सतीश देसाई आदी उपस्थित होते. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक द. मा. मिरासदार यांच्या हस्ते ग्लोबल पुलोत्सवाच्या लोगोचे उद्घाटन क रण्यात आले. वर्षभर होणार्या या ग्लोबल पुलोत्सवात 500 कलाकार, साहित्यिक, आणि प्रमुख पाहुणे सहभागी होतील. परंपरेनुसार प्रत्येक शहरातील पुलोत्सवात ’पु. ल. स्मृती सन्मान’, पु.ल.जीवन गौरव’ ’पु. ल. कृतज्ञता सन्मान’, आणि पु. ल. तरुणाई सन्मान प्रदान करण्यात येणार आहे. भारतातील पुणे, मुंबई, ठाणे, सांगली, नाशिक, जळगावसह 20 देशात पुलोत्सव साजरा होईल. तर भारताबाहेरील युरोप, आशिया, अमेरिका, कॅनडा, आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, न्यूझिलंड आदी देशातील 30 शहरात ’ग्लोबल पुलोत्सव’ हा कार्यक्रम साजरा होणार आहे. पुलोत्सव हा सर्वसमावेशक व्हावा आणि या महोत्सवात पु. ल. प्रेमी आणि विविध शहरातील संस्थांनी सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.