Breaking News

च-होली, रावेत आणि मोशीतील प्रकल्पास केंद्राची अंतिम मंजुरी

पुणे, दि. 01, डिसेंबर - प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत पिंपरी-चिंचवड महापालिकेमार्फत च-होली, रावेत आणि मोशीतील बो-हाडेवाडीमध्ये बांधण्यात येणा-या गृहप्रक ल्पाच्या ’डीपीआर’ला केंद्र सरकारच्या तांत्रिक समितीने मंजुरी दिली. च-होली, रावेत आणि मोशीतील बो-हाडेवाडीमध्ये एकूण तीन हजार 664 घरे बांधण्यात येणार आहेत. या तीनही ठिकाणचे प्रकल्प एकूण 377 कोटी 28 लाखांच्या खर्चाचे आहेत.

नागरी भागासाठी पंतप्रधान आवास योजनेतून शहराच्या विविध भागात 10 ठिकाणी 9 हजार 458 सदनिका बांधण्याचे नियोजन आहे. त्यानुसार च-होली येथे 1442, रावेतमध्ये 1080, डुडुळगावमध्ये 896, दिघीत 840, मोशी - बो-हाडेवाडीमध्ये 1400, वडमुखवाडीत 1400, चिखलीमध्ये 1400, पिंपरीत 300, पिंपरीतच आणखी 200 आणि  आकुर्डीमध्ये 500 सदनिका उभारण्याचे प्रस्तावित आहे.

या योजनेच्या प्रत्येक ठिकाणचा (डीपीआर) सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करून राज्यस्तरीय तांत्रिक समितीची मंजुरी घेतली होती. त्यानंतर डीपीआर अंतिम मंजुरीसाठी केंद्र सरकारकडे पाठविला होता. त्यानुसार केंद्र सरकारच्या तांत्रिक समितीने च-होली, रावेत आणि मोशीतील बो-हाडेवाडी या तीन ठिकाणी राबविल्या जाणा-या या योजनेच्या डीपीआरला बुधवारी मंजुरी दिली आहे. त्यामुळे पंतप्रधान आवास योजनेच्या कामाला सुरुवात करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. याठिकाणी एकूण तीन हजार 664 घरे बांधण्यात येणार आहेत. या तीनही प्रकल्पांना एकूण 377 कोटी 28 लाखांचा खर्च येणार आहे.

याबाबत बोलताना सभागृह नेते एकनाथ पवार म्हणाले, ’’प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत पिंपरी-चिंचवड महापालिकेमार्फत च-होली, रावेत आणि मोशीतील बो-हाडेवाडीमध्ये बांधण्यात येणा-या गृहप्रकल्पाच्या ’डीपीआर’ला केंद्र सरकारच्या तांत्रिक समितीने मंजुरी दिली आहे. त्यामुळे बांधकाम सुरु करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. येत्या दोन ते तीन महिन्यात प्रकल्पाचे काम सुरु होईल’’