Breaking News

पो.नि.शिळीमकरांच्या बदलीने सर्व क्षेत्रातील नागरिकांना धक्का

आपल्या प्रशासनात माणसासाठी कायदा आहे आणि कायद्यासाठी माणूस नाही, असे धोरण राबवणारे पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांची अवघ्या एक वर्षात बदली झाली. त्यामुळे सर्वच क्षेत्रातील नागरिकांना मोठा धक्का बसला. त्यांच्या वर्षभराच्या कारकीर्दीत गुन्हेगारीचा दर कमी झाला, असे गौरवोद्गार काल रात्री अकोले पोलिस ठाण्यात झालेल्या त्यांच्या निरोप समारंभप्रसंगी प्रत्येक वक्त्यांंनी काढले. 
नगर जिल्ह्यात अकोले पोलिस ठाणे ’आयएससो’ मानांकन मिळवणारे पो.नि. शिळीमकर हे सर्वपैलू व्यक्तिमत्व होते. एखाद्या दवाखान्यात रुग्णांची रांग ’ओपीडी’ साठी लागावी तशी रांग गेले वर्षभर त्यांच्या कार्यालयाबाहेर अथवा प्रतिक्षागृहात लागत होती. यातच त्यांचे कसब दिसून आले. शिवाय नवरा बायकोचे भांडण असो, अथवा युवक युवतीचे पलायन असो त्या सर्वांना आणि शेत बांधाचे भांडण असो अथवा जातीय ताणतणावाचे वारे वाहत असो शिळीमकर यांनी सामान्य माणसाला न्याय मिळवून देणारे धोरण अवलंबणारे पाऊल उचलले अशी भावना यावेळेस व्यक्त केली गेली. अकोले तालुक्याच्या इतिहासात असा पहिला निरोप समारंभ काल रात्री झाला. अकोले तहसीलदार मुकेश कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते दशरथ सावंत, पो.नि. शिळीमकर, नव्याने रुजू झालेले पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ, सहायक पोलिस निरीक्षक पी. एस. कादरी, हभप. दौलत महाराज शेटे आदी मान्यवर यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते. दशरथ सावंत म्हणाले की, शिळीमकर यांनी अकोलेत सौहार्दाचे वातावरण तयार केले. त्यांचे समुपदेशनाचे कौशल्य वाखाणण्याजोगे आहे.आपल्याला 80 वर्षांच्या हयातीत पहिला पोलिस अधिकारी भावला की जो पोलिस तर होताच, त्यापेक्षा तो माणूस अधिक होता. तहसीलदार मुकेश कांबळे म्हणाले की, कोणतीही परिस्थिती हाताळण्याचे शिळीमकर यांचे कौशल्य हे वाखाणण्याजोगे होते. त्यामुळे अकोले येथे गेल्या वर्षभरात संघर्षाचे वातावरण तयार झाले नाही. पो.नि. शिळीमकर यांनी आपल्या भाषणात सांगितले की, अकोले तालुक्यातील जनतेचे आभार मानताना अकोले पोलिस ठाणे आयएससो मानांकन मिळवण्याचे सर्व श्रेय अकोलेकरांना जाते आहे. हे टीम वर्क होते. यासाठी अकोल्याचे पोलिस व अधिकारी यांचे बळ मिळाले. असे त्यांनी निदर्शनास आणून दिले. आपण जागा सोडतो पण माणसे जोडतो. माणसे जोडणारे आपले कौशल्य असल्याने सकारात्मक दृष्टीकोन ठेवून गेले वर्षभर आपण आपला कारभार हाकला. आपली वैचारिक बैठक तयार केली. याही काळात आपली चूक झाली असेल, त्याबद्धल आपण माफी मागतो. असे उधृत केले. यावेळेस पत्रकार संघाचे विश्‍वस्त प्रा. डी.के. वैद्य, पत्रकार हेमंत आवारी, सुभाष खरबस, भाजपाचे तालुका अद्यक्ष सीताराम भांगरे, शिवसेना तालुकाप्रमुख मच्छिंद्र धुमाळ, पंचायत समिती सदस्य संत नामदेव आंबरे, अगस्ती सहकारी साखर कारखान्याचे संचालक महेश नवले, अ‍ॅड. बाळासाहेब वैद्य, हभप. दौलत महाराज शेटे, डॉ. संदीप कडलग, अकोले शिक्षण संस्थेचे सदस्य आरिफ तांबोळी, पोलिस उपनिरीक्षक विकास काळे, बाळासाहेब कोकणे, नगरसेवक प्रमोद मंडलिक आदींची यावेळेस भाषणे झाली. स्वागत व प्रास्ताविक करून पोलिस उपनिरीक्षक नितीन बेंद्रे यांनी सूत्रसंचालन केले. पोलिस उपनिरीक्षक बालाजी शेंगेपल्लू यांनी आभार मानले. अकोले नगर पंचायतीचे उपनगराध्यक्ष बाळासाहेब वडजे, उद्योजक नितीन गोडसे, मच्छिंद्र मंडलिक, बहुतेक वकील, नगरसेवक, पोलिस पाटील यांसह नागरिक यावेळी मोठ्या संख्येने या कार्यक्रमास उपस्थित होते.