Breaking News

हरिश्‍चंद्र गड परिसरात पावसाच्या सरी; मुळा नदीच्या पाणी पातळीत वाढ

भंडारदर्‍यातून विसर्ग, पाणीसाठा 20 टक्क्यांवर 

अकोले, दि. 29 - हरिश्‍चंद्र गड परिसरात पडत असणार्‍या पावसामुळे मुळा नदीच्या पाणीपातळीत पुन्हा वाढ होवू लागली आहे. मुळा नदीवरील पिंपळगाव खांड धरण भरण्याच्या मार्गावर आहे. दरम्यान सध्या भंडारदर्‍यातून 1 हजार 237 क्यूसेक विसर्ग सुरु असल्याने धरणाचा पाणीसाठा 20 टक्क्यांपेक्षा कमी झाला आहे. 
मागील आठवडयात पाणलोट क्षेत्रात एक दिवस चांगला पाऊस पडला. मात्र 24 तासातच पावसाचा जोर ओसरला. दोन, तीन दिवस पावसाने पुर्णपणे दडी मारली होती. काल पासून कळसूबाई, हरिश्‍चंद्रगड परिसरात पावसाचे पुनरगमान झाले आहे. पाऊस टिकून असला तरी त्यात विशेष जोर नाही. हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी पडत आहेत. आज सकाळपर्यंतच्या 24 तासात भंडारदरा पाणलोट क्षेत्रात पडलेला पाऊस मिमीमध्ये पुढीलप्रमाणे - भंडारदरा 18, रतनवाडी 44, घाटघर 65, पांजरे 29, वाकी 17 कालच्या तुलनेत आज पावसाचा जोर काहीसा वाढला. दिवसभराच्या 12 तासात भंडारदर्‍याला 17 मिमी पावसाची नोंद झाली. याच कालावधीत धरणात 175 दलघफू नवीन पाण्याची आवक झाली. धरणातून पिण्याच्या पाण्यासाठी कालपासून आवर्तन सोडण्यात येत आहे. सध्या भंडारदर्‍यातून 1 हजार 237 क्यूसेक विसर्ग सुरु आहे. त्यामुळे धरणात आलेल्या पाण्यापैकी 52 दलघफू पाण्याचा वापर झाला व धरणाच्या पाणीसाठ्यात 123 दलघफूटाने वाढ झाली. आज सायंकाळी भंडारदरा धरणातील पाणीसाठा 2 हजार 285 दलघफू झाला होता. सकाळी निळवंडे धरणातील पाणीसाठा 581 दलघफू होता. निळवंडेतून सध्या 1 हजार 400 क्यूसेकने आवर्तन सुरु आहे. मुंबई आणि कोकणात पडत असणार्‍या मुसळधार पावसाच्या तुलनेत अकोले तालुक्यातील घाटमाथ्यावर पावसाचे प्रमाण फारच कमी आहे. पाणलोट क्षेत्राला मुसळधार पावसाची प्रतिक्षा आहे. धरणातील पाणीसाठा वाढण्यासाठी अशा पावसाची गरज आहे.