Breaking News

छगन भुजबळ - अ‍ॅड. सहाणे भेटीने बेरजेचे समिकरण

नाशिक/प्रतिनिधी
नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघातून भाजपाच्या पाठींब्यावर निवडणूक लढवून गद्दारांमुळे पराभूत झालेले राष्ट्रवादीचे उमेदवार अ‍ॅड. शिवाजी सहाणे यांनी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांची मुंबई मुक्कामी भेट घेऊन राजकीय वाटचालीबाबत विचारविमर्श करून मार्गदर्शन घेतले.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नाशिक विधानपरिषदेच्या निवडणूक झालेला पराभव पचवून अ‍ॅड. शिवाजी सहाणे राजकीय प्रवासासाठी पुन्हा नव्या दम्याने सज्ज झाले असून या नव्या दमदार प्रवासाची सुरूवात सहाणे यांनी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांचा आशीर्वाद घेऊन केली.
अ‍ॅड. शिवाजी सहाणे यांनी राष्ट्रवादीच्या तिकिटावर उमेदवारी केल्यानंतर शिवसेनेशी असलेली युती तोडून मुख्यमंत्र्यांनी नाशिकमध्ये भाजपाने राष्ट्रवादीला पाठींबा देण्याचे आदेश दिले होते. या नव्या समिकरणामुळे अ‍ॅड. शिवाजी सहाणे यांचा विजय निश्‍चित मानला जात असताना घरभेदी आणि मुख्यमंत्र्यांचा आदेश पायदळी तुडविणारे भाजपेयींच्या गद्दारीने शिवाजी सहाणेंच्या विजयाला हुलकावणी दिली.
त्यानंतर अ‍ॅड. सहाणे प्रथमच राजकारणात सक्रीय झाले असून आगामी काळातील राजकीय दिशा ठरविण्याच्या हेतूने त्यांनी मुंबईत आ. छगन भुजबळ यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले.
या भेटीत विधानपरिषद निवडणूकीत कुणी काय कुटनिती वापरली? कुणी गद्दारी केली, याचा आढावा सादर केला. एकूण भुतकाळाचा विचार करून छगन भुजबळांच्या मार्गदर्शनानुरूप पुढील रणनिती आखण्याचा मानस सहाणे यांनी बोलून दाखवला. आगामी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्‍वभूमीवर याभेटीकडे राजकीय निरिक्षक बेरजेचे समीकरण या नजरेने पहात आहेत.