सुभद्रानगरमधील रस्त्याचे काम रखडले
कोपरगाव ता. प्रतिनिधी
शहरातील सुभद्रानगरमध्ये मागील वर्षी {दि. २१ जून २०१७} रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. परंतु एक वर्ष होऊनही आजपर्यंत या रस्त्याचे काम सुरु झालेले नाही. त्यामुळे या रस्त्याचे काम तातडीने सुरु करावे, अशा आशयाचे निवेदन नुकतेच सुभद्रानगरच्या रहिवाशांनी नगराध्यक्ष विजय वहाडणे यांना दिले.
यावेळी डॉ. अनिरुद्ध काळे, संदीप सावतडकर, रुपेश वाघचौरे, राहुल हंसवाल, भूषण मुंदडा, सुमित भोंगळे, मंगेश लोखंडे, कुंदन भारंबे, तुषार भगत आदी नागरिक उपस्थित होते.
या निवेदनात म्हटले आहे, कोपरगाव तालुक्याच्या एका राजकीय नेत्याच्या वाढदिवसाच्या दिवशी नगरपरिषदेच्या सत्ताधारी नगरसेवकांनी या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन केले होते. परंतु आजतागायत या रस्त्याचे काम तर सोडाच पण साधा एक खड्डा सुद्धा बुजविला गेला नाही. त्यामुळे सुभद्रानगरमधील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. दरम्यान, प्रत्यक्षात विकासकामांना सुरुवात होत नाही, ही सुभद्रानगरच्या नागरिकांची दिशाभूल आहे. रस्त्याच्या कामांची भूमिपूजन कोणीही करा मात्र प्रत्यक्षात विकास कामांना सुरुवात करा. नेत्यांचे वाढदिवस साजरा करा. पण केवळ खोटी प्रसिद्धी मिळविण्यासाठी विकासकामांची खोटे भूमिपूजन जनतेच्या भावनांशी खेळू नका, अशा प्रतिक्रिया सुभद्रानगरच्या नागरिकांमधून व्यक्त होत आहेत.