पोरधरींनी टाटा सुमोतून मुले पळविली? अफवेने शिक्षकांची उडाली भंबेरी
कोपरगाव ता. प्रतिनिधी
‘एका टाटा सुमो वाहनात पाच ते सहा मुलांना पाझर तलाव परिसरातून पळवून नेण्यात आले आहे. या वाहनातून मुले रडण्याचा आवाज येत होता’ अशी अफवा पढेगावमध्ये अज्ञात इसमाने पसरवली. यामुळे प्रचंड घाबरलेल्या मात्र या अफवेमुळे शाळेतील शिक्षक आणि पालकांची चांगलीच भंबेरी उडाली. याची शहानिशा करण्यासाठी पालकांनी शाळेत धाव घेतली.
हल्ली सगळीकडे मुलं पळवून नेत असल्याची अफवा पसरत आहे. त्यामुळे तालुक्यातील त्याला अपवाद ठरले नाही. सकाळी शाळा सुरु असताना गावात कुणीतरी सहजपणे अफवा सोडली. त्यामुळे शाळेच्या शिक्षकांची धावाधाव सुरु झाली. त्यात जसजशी पालकांच्या कानावर ही अफवा गेली, तसतशी पालकांनी शाळेच्या प्रांगणात मुलांना घेण्यासाठी तोबा गर्दी केली. प्रत्यक्ष वर्गात जाऊन आपली मुल सुरक्षित आहेत की नाही. ते पालक पाहू लागले. बघता बघता तासाभरात पालकांनी विद्यार्थ्यांना सोबत नेऊन अवघी शाळाच रिकामी केली. सुदैवाने कुणाचेही मुले पळवून नेल्याची घटना घडली नाही. केवळ शंकांचे ‘विडे’ चघळत कुशंकांची पिंक टाकत सध्या अफवा पसरविल्या जात आहेत. त्यामुळे परिसरात आणखी भितीचे वातावरण निर्माण होत आहे. मात्र अफवा पसरविणारा इसम मात्र सापडू शकला नाही. अफवांवर विश्वास ठेऊ नका, असे पोलिसांनी आवाहन केले तरी ग्रामीण भागांत दुर्दैवाने यावर विश्वास ठेवला जात आहे.