Breaking News

गुरेघर येथे जंगलात भीषण आग; लाखो रुपयांची वनसंपदा नष्ट

पाचगणी, दि. 23 (प्रतिनिधी) : महाबळेश्‍वर तालुक्यातील गुरेघर येथील वनसंशोधन केंद्राच्या हद्दीतील व महाबळेश्‍वर वनपरिक्षेत्रातील जंगलाला लागलेल्या भीषण आगीत लाखो रुपयांची वनसंपदा नष्ट झाली.
पाचगणी-महाबळेश्‍वर मुख्यमार्गावर बोंडारवाडीनजीक महाबळेश्‍वर वन परिक्षेत्रातील जंगलाला सकाळी अचानक आग लागली. थोड्याच वेळात आगीने रौद्ररूप धारण केले. आग वनसंशोधन केंद्राच्या हद्दीत पसरली. अवकाळी, बोंडारवाडी येथील ग्रामस्थ, व वन विभागाच्या कर्मचार्‍यांनी स्थानिक साधनसामग्रीचा उपयोग करून आग आटोक्यात आणण्याचे आटोकाट प्रयत्न केले. परंतू आगीच्या प्रचंड झळा व उन्हाच्या तीव्रतेमुळे आगीपर्यंत पोहोचणे शक्य होत नव्हते. महाबळेश्‍वर व पाचगणी पालिकेचे अग्नीशामक बंब घटनास्थळी दाखल झाल्यावर बंबांच्या सहाय्याने आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न करण्यात आले. काही ठिकाणी जंगलात वाट नसल्याने अग्निशामक बंब तेथे पोहचू शकत नव्हते.
परिसरातील युवकांनी धाडसाने आग आटोक्यात आणली. या आगीत सुमारे तीन हेक्टर क्षेत्रातील वनसंपदा आगीत जळून खाक झाली. निहाल बागवान, तपन पोरे, अजय बोरा, महेश बिरामणे, सूर्यकांत कासुर्डे, नासीर शेख, अफजल डांगे, सागर डांगिस्ते, बापू झाडे व ग्रामस्थांनी आग आटोक्यात आणण्यासाठी विशेष परिश्रम घेतले. आगीची माहिती मिळताच वनक्षेत्रपाल एस. डी. कुलकर्णी यांनी सहकार्‍यांसह तेथे धाव घेतली. वनपाल सुनील लांडगे, वनरक्षक सागर कोळी, कार्यालयीन वनरक्षक सहदेव भिसे व कर्मचार्‍यांच्या मदतीने त्यांनी उपाययोजना केल्या.