आश्वी बुद्रुक येथे मृत अर्भक आढळले
आश्वी : प्रतिनिधी
संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक येथील पडक्या घरात अवघ्या चार महिने वयाचे स्त्री जातीचे मृत अर्भक आढळल्याने परीसरात एकच खळबळ उडाली. दरम्यान, आश्वी पोलिस मृत अर्भक टाकणाऱ्या अज्ञात व्यक्तीचा कसून शोध घेत आहेत.
येथील विरभद्र रस्त्यालगत असलेल्या एका पडक्या घरात हे अर्भक अज्ञात व्यक्तीने आणून टाकले होते. बुधवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास परिसरातील काही ग्रामस्थांना ही बाब लक्षात आली. त्यांनतर डाॅ. समीर शेख यांनी याबाबतची माहिती आश्वी पोलिस स्टेशनला दिली. यावेळी पोलिस निरीक्षक अनिल कटके यांनी या प्रकरणाची तात्काळ दखल घेत पोलिस उपनिरीक्षक दत्तात्रय उजे, पोलिस नाईक संजय लाटे यांना घटनास्थळी त्वरीत जाण्याच्या सूचना केल्या. यावेळी पोलिसांनी घटनास्थळी येत मृत अर्भक ताब्यात घेतले. उत्तरीय तपासणीसाठी ते लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुगणालयात दाखल करण्यात आले. हे अर्भक अनैतिक संबंधातून टाकले असावे की, मुलीचा गर्भ असल्याने बेकायदेशीर गर्भपात करुन हे अर्भक येथे आणून टाकून देण्यात आले, याबाबत उलट-सुलट चर्चा सुरु आहे.