Breaking News

तहसिलदारांच्या आशिर्वादाने स्वस्त धान्य दुकान गावाबाहेर, तक्रारी करूनही मिळेना ग्रामस्थांना न्याय

पारनेर तालुक्यातील म्हसणे (सुलतानपूर) येथिल स्वस्त धान्य दुकान तहसिलदारांच्या आशिर्वादाने गावापासून 500 मि. अंतरावर सूरू असून, ती जागाही दुकानचालकाच्या मालकीची असल्याचे समोर आले आहे. गावातील महिला धान्य आणणेसाठी गेल्यानंतर दुकानचालक महिलांना आरेरावीची भाषा वापरत असून, चालकाकडून पुरवठा विभागासह तहसिलदारांचे हात ओले करत असल्याने धान्य वाटपाबाबत काही माहिती विचारली असता, दमदाटीची भाषा वापरत असल्याचा आरोप शंकर रेवजी तांबे यांनी केला आहे.


म्हसणे (सुलतानपूर) येथिल स्वस्त धान्य दुकान गावातील जनसेवा महिला बचत गटाकडे गेल्या अनेक वर्षापासून चालवले जात आहे. हे दुकान गावठाणात चालविणे अनिवार्य असतांना गावापासून दूर सुमारे 500 मीटर अंतरावर एका वस्तीवर चालवले जात आहे. गावकर्‍यांसह महिला व ज्येष्ठ नागरीक यांची पायपीट थांबावी यासाठी, 18 ऑगष्ट 2017 रोजी अंजना तांबे व ग्रामस्थांनी तहसिलदारांना स्वस्त धान्य दुकान गावामध्ये स्थलांतरीत करणेबाबत निवेदन व ग्रामपंचायतीचा ठराव देण्यात आला. तहसीलमार्फत 1 नोव्हेंबर 2017 रोजी म्हसणे येथील तलाठी कार्यालयात तक्रार निवारणासाठी बैठक ठेवण्यात आली. पुरवठा निरिक्षक पारनेर यांच्या उपस्थितीत चौकशी चालू असतांना दुकान चालकाकडून तांबे यांचा मुलगा मारुती शंकर तांबे यास मारहाण शिवीगाळ करून, तेथून हाकलून देण्याचा प्रयत्न केला. दुकानदाराच्या दंडीलशाही पुढे ग्रामस्थ त्याच्याविरोधात बोलत नाही तसेच, गावातील महिलांना पुढे करून अर्जदार व त्यांच्या कुटुंबीयांवर दडपण आणतात. धान्य घेतल्यानंतर दुकानदार पावती देत नाही. उर्वरित सुट्टे पैसे देखिल देत नाहीत. या स्वस्त धान्य दुकानात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू आहे. याबाबत महाराष्ट्र शासनाचे आपले सरकार पोर्टलवर, जिल्हाधिकारी अहमदनगर, पारनेर तहसिलदार यांना अनेक वेळा तक्रार करून देखील दुकान गावात आणण्याबाबत कुठल्याही उपाययोजना केल्या जात नसल्याने, ग्रामस्थांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

तहसिलदारांकडून कारवाईस टाळाटाळ 
म्हसणे (सुलतानपूर) येथील स्वस्त धान्य दुकाण गेल्या अनेक दिवसांपासून गावाबाहेर एका वस्तीवर चालवले जात आहे. दुकानचालक पुरवठा विभागाचे सर्व नियम पायदळी तुडवून ग्रामस्थांना वेठीस धरत असतांना तसेच, ग्रामसभेचा ठराव दिला असतांनाही, ग्रामस्थांनी तक्रार करुनदेखील तहसिलदारांकडून कारवाईस टाळाटाळ केली जात आहे.

दुकानचालकांची मुजोरी !
तालुक्यात स्वस्त धान्य दुकान सेवा सोसायटी मार्फत तर, काही गावात महिला बचत गटामार्फत चालविली जातात. चालू वर्षापासून पुरवठा विभागामार्फत आधार लिंक करुन कुटुंबातील व्यक्ती असेल तरच धान्य वाटप केले जाते. मात्र आजही काही दुकानचालक आपल्या दंडीलशाहीच्या जोरावर ग्राहकांना पावती न देता जादा पैसे घेवून धान्याची विक्री करतात, हे सर्व प्रकार पुरवठा विभागास माहिती असूनही त्याकडे डोळेझाक केली जात आहे.