Breaking News

फर्जंद चित्रपटाचे मल्टीप्लेक्समधील शो त्वरित वाढवा - रंजन ठाकरे

नाशिक, दि. 09, जून - महाराष्ट्र राज्याचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज व शूरवीर कोंडाजी फर्जंद यांच्या जीवनावरील सत्यघटनेवर आधारित फर्जंद या चित्रपटाचे सिनेमॅक्स मल्टीप्लेक्समधील शो त्वरित वाढविण्यात यावे, असे निवेदन शहराध्यक्ष रंजन ठाकरे व सरचिटणीस प्रफुल्ल पाटील यांनी मल्टीप्लेक्सचे व्यवस्थापक यांना दिले.

रयतेचा राजा म्हणून ओळखल्या जाणार्‍या छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराजाच्या स्वप्नासाठी मोलाचे योगदान देणार्‍या कोंडाजी फर्जंद यांच्या धाडसाची गाथा सांगणारा सत्यघटना आधारित चित्रपट फर्जंद पाहण्यास प्रेक्षकांची गर्दी होत असताना शहरातील मल्टीप्लेक्समध्ये एक किंवा दोन शो दाखवीत असल्याची खंत शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांनी व्यक्त केली. फर्जंद हा चित्रपट गर्दी खेचत असून चित्रपटगृहात एक किंवा दोन शो असल्याने प्रेक्षकांना चित्रपटाची तिकिटे मिळत नसल्याच्या तक्रारी येत आहे.
मल्टीप्लेक्समध्ये मराठी चित्रपट लागत नसल्याने तसेच प्राईम टाइममध्ये दिवसभरात एकच शो मिळत असल्यामुळे निर्मात्यांचा तोटा होत आहे. यामुळे मराठी चित्रपट काढण्यास कोणताही निर्माता तयार होत नसल्याने चांगले चित्रपट तयार होत नाही. फर्जंद हा चित्रपट छत्रपती शिवाजी महाराज व त्यांच्या शूरवीर लढवय्यावर आधारित असून महाराष्ट्रतील जनतेला पुरोगामी महाराष्ट्र समजावा म्हणून असे प्रबोधनात्मक चित्रपट चित्रपटगृहाने पूर्णवेळ दाखविले पाहिजे, परंतु मल्टीप्लेक्समध्ये एक किंवा दोनच शो मिळत असल्याने शहरातील मल्टीप्लेक्समधील शो त्वरित वाढविण्यात यावे, असे निवेदन ठाकरे व पाटील यांनी दिले. येत्या दोन दिवसात शो वाढविण्यात न आल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही देण्यात आला.