कालव्याद्वारे पाणी सोडून बंधारे आणि शेततळे भरून द्या : परजणे
कोपरगाव शहर प्रतिनिधी
यंदाच्या पावसाळ्यात महाराष्ट्रातील इतर भागात चांगला पाऊस पडत असला तरी कोपरगाव तालुक्यात मात्र पावसाने ओढ दिली आहे. त्यामुळे खरिपाची पिके सुकायला लागली आहेत. नाशिक परिसरात होत असलेल्या पावसाचे गोदावरी नदीतून सोडले जात आहे. ते पाणी कालव्याद्वारे सोडून लाभक्षेत्रातील गावातील बंधारे तसेच ओढ्या नाल्यांवरील बंधारे भरून द्यावेत, अशी मागणी गोदावरी खोरे नामदेवराव परजणे तालुका दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजण यांनी केली आहे.
यासंदर्भात परजणे यांनी राज्याचे जलसंपदामंत्री गिरीष महाजन आणि विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांना पाठविले आहे. यात त्यांनी म्हटले आहे, पावसाळा सुरू होऊन सुमारे दीड महिना उलटला. सुरुवातीला झालेल्या मृग नक्षत्राच्या पावसावर शेतकर्यांनी खरिपाच्या पेरणी उरकून घेतल्या. मात्र त्यानंतर पावसाने दडी मारल्याने खरिप पिके वाया जाण्याच्या मार्गावर आहेत. कोपरगाव तालुक्यात पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. सध्या उर्ध्व गोदावरी खोऱ्यात पाऊस सुरू असल्याने धरण क्षेत्रातही पाण्याची चांगली आवक सुरु आहे. गोदावरीच्या डाव्या व उजवा कालव्यासह पालखेड व [एक्स्प्रेस] जलद कालव्याद्वारे सोडून गावतळे, बंधारे, ओढे, नाले भरून दिल्यास तालुक्यातील पिण्याच्या पाण्याबरोबरच शेतीच्या पाण्याचा प्रश्न काही प्रमाणात सुटण्यास मदत होईल.