Breaking News

मेस्सीचे अर्जेंटिना 'तरले' नायजेरियाला पराभूत करून अर्जेंटिना बादफेरीत



मॉस्को वृत्तसंस्था

फिफा वर्ल्ड कप साखळीतला कालचा सामना अर्जेंटिनासाठी 'करो या मरो' स्थितीतला होता.हा सामना अर्जेंटिना विरुद्ध नायजेरिया असा रंगला होता. यापूर्वीच्या सामन्यांमध्ये अर्जेंटिनाचा स्टार स्ट्रायकर लिओनेल मेसी आपली छाप पाडू न शकल्याने अर्जेंटिनावर स्पर्धेतून बाहेर पडण्याची वेळ येऊन ठेपली होती. परंतु या सामन्यात अखेर मेस्सीची जादू चालली आणि १४ व्य मिनिटाला त्याने गोल केला आणि विजयी घौडदौड चालू ठेवली.

अर्जेंटिनाचा कर्णधार मेसीने सामन्याच्या १४ व्या मिनिटाला गोल करत संघाला आघाडी मिळवून दिली. फिफा विश्वचषकात लायनेल मेसीने तब्बल ६६२ मिनिटांनंतर गोल केला. मेसीने २०१४ च्या विश्वचषकात नायजेरियाविरुद्धच अखेरचा गोल केला होता. हाफटाइमपर्यंत अर्जेंटिनाने १-० अशी आघाडी घेतली होती. पण नायजेरियाच्या व्हिक्टर मोसेने ५१ व्या मिनिटाला पेनल्टीवर गोल करत १-१ अशी बरोबर साधून दिली. सामना संपायला काही मिनिटे शिल्लक असेपर्यंत हा सामना बरोबरीत सुटणार असे वाटत असतानाच मार्कोस रोजोने ८७ व्या मिनिटाला जबरदस्त गोल करत अर्जेंटिनाला २-१ अशी आघाडी मिळवून दिली. अखेरपर्यंत अर्जेंटिनाने ही आघाडी कायम ठेवली.

अर्जेंटिना संघाने सुरूवात चांगली केली. चेंडूवर त्यांचे चांगले नियंत्रण होते. नायजेरियाच्या खेळाडुंना पहिल्या हाफमध्ये काही खास करता आले नाही. मेसीने १४ व्या मिनिटाला गोल करत आपल्या संघाला आघाडी मिळवून दिली. हाफटाइमपर्यंत अर्जेंटिनाने ही आघाडी कायम ठेवली होती. दुसऱ्या हाफमध्ये दोन्ही संघांना काही संधी मिळाल्या. पण यश फक्त मोसेला पेनल्टीवर मिळाले. त्यानंतर रोजोच्या गोलमुळे अर्जेंटिनाचा विजय सुकर झाला.

विश्वचषकात अर्जेंटिनाचा यापूर्वीचा आईसलँडविरूद्धचा सामना बरोबरीत सुटला होता तर क्रोएिशयाने त्यांना पराभूत केले होते. तर नायजेरियाचा क्रोएिशयाकडून पराभव झाल्यानंतर त्यांनी आईसलँडचा २-० ने सहज पराभव केला होता.बादफेरीत प्रवेश मिळवण्यासाठी अर्जेंटिनासाठी हा विजय खूप महत्वाचा होता. बादफेरीत त्यांची आता बलाढ्य फ्रान्सशी लढत रंगणार आहे.