दुबई मास्टर्स कबड्डी: भारताची केनियावर मात
मुंबई प्रतिनिधी
दुबईत सुरु असलेल्या कबड्डी मास्टर्स स्पर्धेत भारताने आपला अखेरचा साखळी सामना जिंकत केनियावर मात केली आहे. ५०-१५ अशा मोठ्या फरकाने सामना जिंकत भारताने उपांत्य फेरीतलं आपलं स्थान निश्चीत केलं आहे. उपांत्य फेरीत भारताची गाठ कोरियाशी पडणार आहे.
भारताचा हा सलग दुसरा विजय ठरला. आजच्या सामन्यात सुरुवातीपासून भारतीय खेळाडूंनी आपलं वर्चस्व कायम राखलं होतं. भारताने सातव्याच मिनिटाला केनियाला 'ऑल आउट' करून १२-३ अशी आघाडी घेतली होती. भारताने १८व्या मिनिटाला दुसऱ्यांदा केनियाचा संपूर्ण संघ बाद करून २४-९ अशी आघाडी वाढवली. मध्यंतराला भारताकडे २७-९ अशी आघाडी होती. उत्तरार्धातही भारताने केनियाला संधी दिली नाही. भारताकडून रिशांक देवाडिगाने १५ गुण, तर मोनू गोयतने १० गुण मिळवले. दोन लढतींनंतर भारताचे १० गुण झाले आहेत. मध्यांतरानंतर केनियाने सामन्यात पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला होता परंतु त्यांचे हे प्रयत्न तोकडेच पडले.