नक्षलवादी हल्ल्यात सहा जवान शहीद
रांची : झारखंडमधील गढवा जिह्याच्या छिंजो भागात माओवाद्यांनी घडवून आणलेल्या भूसुरूंग स्फोटात सहा जवान शहीद झाले. मंगळवारी रात्री सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली. माओवाद्यांच्या या हल्ल्यात काही जवान गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. लातेहार आणि गढवाच्या सीमावर्ती भागातील छिंजो परिसरात माओवाद्यांचा वावर असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्या आधारे पोलिस आणि सुरक्षा रक्षकांनी संयुक्त शोध मोहीम सुरू केली. छिंजो भागात जवान पोहचताच दबा धरून बसलेल्या माओवाद्यांनी गोळीबार सुरू केला. सोबतच रस्त्याखाली दडविलेल्या भूसुरूंगांचा स्फोट घडवून आणला. यात झारखंड जगुआरचे सहा जवान शहीद झाले. रात्री उशीरापर्यंत चकमक सुरूच होती. जवानांच्या मदतीसाठी सुरक्षा दलाच्या आणखी काही तुकड्या घटनास्थळी रवाना करण्यात आल्या आहेत, अशी माहिती गढवाचे पोलिस उपमहानिरीक्षक विपुल शुक्ला यांनी दिली. झारखंड जगुआर हे राज्य पोलिसांचे माओवादविरोधी लढ्यातील विशेष सशस्त दल आहे.