Breaking News

राज्य आणि केंद्रातले सरकार शेतकर्यांच्या मुळावर उठले: आ. पिचड.

अकोले प्रतिनिधी

कांदा, टोमॅटो, ऊस, डाळिंब आदी पिकांना भाव नाही. साखर, दुधाचे भावही कवडीमोल झाले आहेत. त्यामुळे शेतकर्याचे कष्ट फुकट जात आहेत. शेतकरी पूर्णपणे उध्वस्त झाला आहे. देशातील २२ राज्यातील शेतकरी संपावर गेले आहेत. राज्य व केंद्रातले सरकार हे शेतकर्यांच्या मुळावर उठले आहे, असा आरोप आ. वैभव पिचड यांनी पत्रकार परिषदेद्वारे केला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष गिरजा जाधव आणि सेक्रेटरी यशवंतराव आभाळे उपस्थित होते.

आ. पिचड म्हणाले, भाजप म्हणजे ‘बनवाबनवी’ची पार्टी आहे. पक्षाने आपले नाव बदलून ‘अशीही बनवाबनवी पार्टी’ असे नाव ठेवावे. घोषणा आणि खोटी स्वप्ने भाजपने जनतेला आणि शेतकर्यांना दाखविले. मात्र शेतकर्यांचे वाटोळे करून या सरकारने आपले खरे रूप दाखवले आहे.

कुठलाही कार्यक्रम नाही. कुठलेही धोरण नाही. हे सरकार फक्त सत्तेत धुंद असून २०१९ साली यांची धुंदी आणि मस्ती जणता उतरविल्याशिवाय राहणार नाही. ‘अच्छे दिन’ आणि ‘सबका विकास’ म्हणणारे मोदी आता शेतकर्यांच्या प्रश्नावर गप्प का, असा परखड सवाल आ. पिचड यांनी केला. भुलथापा मारून सत्ता मिळवली. आता शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेला महागाईच्या दरीत लोटत आहेत. देशात साखर गहु तुर यांचे जास्त उत्पादन असतानाही निर्यातीला चालना देण्याऐवजी बाहेरच्या देशातून साखर, गहू, तूर, आयात करून शेतकर्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम हे सरकार करत आहे. 

आ. पिचड म्हणाले, पत्रकार परिषदेत शेतकर्यावर कधी नाही ती एवढी वाईट परिस्थिती भाजप सरकारमुळे आली आहे. दूधधंद्याच्या बाबतीतही दुधाला भाव नसल्याने शेतकर्यांना गाया म्हशी विकाव्या लागत आहेत. यामुळे लाखो लिटर दूध भाव नसल्याने रस्त्यावर ओतून देत आहेत. मात्र सरकार गंभीर दिसत नाही. याबाबत सरकारचे धोरण उदासिन आहे. 

चौकट 

बळीचे नव्हे मोदींचे राज्य

केंद्रात अमित शहा हुकुमशहासारखे वागत आहेत. मोदी जगाच्या फेर्या मारत आहेत. देशात सरकार नावाला आहे. योजना विकास आराखडे कागदावर शाई रूपानेच आहेत. नव्या वर्षाच्या सुरुवातीला ‘ईडा पिडा टळो आणि बळीचे राज्य येवो’ अशी प्रार्थना केली होती. प्रत्यक्षात मात्र बळीचे राज्य येण्याऐवजी मोदींचे राज्य आले.