Breaking News

शाळा बांधकामासाठी आंदोलनाचा इशारा


राहुरी तालुका प्रतिनिधी

तालुक्याच्या कोळेवाडी गावातील कोकाटे वस्तीवर जिल्हापरिषदेची चौथीची शाळा आहे. या शाळेत एकूण ३१ मुले व मुली शिक्षण घेत आहेत असून हे सर्व आदिवासी समाजातील आहेत. परंतु शाळा सुरू झाल्यापासून आजही ही शाळेचे वर्ग एका खोलीत भरतात. या शाळेचे बांधकाम करण्यात यावे, यासाठी विद्रोही विद्यार्थी संघटनेच्यावतीने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. 

यासंदर्भात शाळा व्यवस्थापन समितीने व ग्रामस्थांनी शाळेला इमारत मिळविण्यासाठी शाळेच्या प्रशासनाच्या माध्यमातून प्रयत्न चालवले आहेत. विद्रोही विद्यार्थी संघटनेने प्रशासनाला निवेदने सादर केले आहेत. शाळा प्रशासनाने पंचायत समितीच्या माध्यमातुन जिल्हापरिषद कडे प्रस्ताव सादर केला आहे. असा प्रस्ताव दोन वेळेस सादर केला आहे. या प्रस्तावाला जिल्हापरिषद कडून पत्र पाठवून उत्तर मिळालं की ' निधी शिल्लक नाही. म्हणून बांधकाम करता येणार नाही.' जिल्हा परिषदेच्या या उत्तराने नागरिकांसमोर प्रश्न निर्माण झाले आहेत की, शिक्षणासाठी निधी नाही असे सांगणारे जिल्हापरिषद प्रशासनाने केलेला भ्रष्टचार आणि निधी खर्च झाला नाही म्हणून शासन जमा केला गेला असल्याची उदाहरणे मिळतात मग शाळा इमारत बांधकाम करण्यासाठी निधी उपलब्ध नसल्याचे उत्तर म्हणजे ढोंग आहे, खोटारडे पणा आहे. म्हणून कोकाटे वस्तीच्या नागरिकांसह संघटनेने आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. अशी माहिती संघटनेचे कार्यकर्ते संदीप कोकाटे व रोहित तेलतुंबडे यांनी दिली आहे.