Breaking News

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त राकेश मारियांची सीबीआय चौकशी

मुंबई, दि. 28 - मुंबईचे माजी पोलिस आयुक्त राकेश मारिया यांची सीबीआयकडून चौकशी करण्यात आली आहे. शीना बोरा हत्या प्रकरणी मारियांसह तीन वरिष्ठ पोलिस  अधिकार्‍यांची सीबीआय चौकशी झाली. सीबीआय शीना बोरा हत्या प्रकरणाचा तपास बंद करण्याच्या तयारीत आहे.
शीना बोरा हत्या प्रकरणाचा सुरुवातीपासून तपास करणार्‍या पथकात तत्कालीन मुंबई पोलिस आयुक्त राकेश मारिया, पोलिस सहआयुक्त (कायदा आणि  सुव्यवस्था) देवेन भारती आणि झोन एक्सचे पोलिस उपायुक्त सत्य नारायण चौधरी होते. इंद्राणी मुखर्जीला याच पथकाने बेड्या ठोकल्या होत्या.
सीबीआयने पीटर मुखर्जी यांना गेल्या वर्षी अटक केली. मारिया यांच्या टीमने मुखर्जींची मालमत्तेशी संबंधित प्रकरणी चौकशीच केली नसल्याचा आरोप होत होता.  त्यामुळे सीबीआय चौकशी झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. शीना बोरा प्रकरणात मारियांनी ‘आश्‍चर्यकारकरित्या जास्त कुतूहल’ दर्शवल्याचं म्हटलं जातं.  त्याचप्रमाणे पीटर यांना वाचवण्याचे प्रयत्न केल्याचा आरोपही केला जातो. आरोपी इंद्राणी मुखर्जीच्या चौकशीसाठी मारियांनी वारंवार खार पोलिस स्टेशनच्या  फेर्‍या मारल्याचाही आरोप होत आहे.
एप्रिल 2012 मध्ये 24 वर्षीय शीना बोराची तिची आई इंद्राणी मुखर्जी, इंद्राणीचे पहिले पती संजीव खन्ना आणि ड्रायव्हर शाम राय यांनी हत्या केल्याचा आरोप  आहे. मारिया या प्रकरणाचा तपास करत असतानाच त्यांना मुंबई पोलिस आयुक्तपदावरुन हटवण्यात आलं. गणपतीसाठी बंदोबस्ताचं कारण त्यावेळी पुढे करण्यात  आलं. मारियांच्या बदलीनंतर मुंबई पोलिस आयुक्तपदी अहमद जावेद यांची वर्णी लागली.