Breaking News

श्री कळसेश्‍वर देवस्थानच्या पर्णकुटीतील धुणी तेवतेय आजही 37 वर्षांपुर्वी पेटवली होती धुणी

अकोले / प्रतिनिधी । 17 ः
तालुक्यातील कळस बुद्रुक येथील श्री क्षेत्र कळसेश्‍वर देवस्थानच्या पर्णकुटीत ब्रह्मलीन महंत सुभाषपूरी महाराज यांनी 37 वर्षांपूर्वी पेटवलेली ’धुणी ’अजूनही अविरतपणे पेटलेलीच आहे.कळसेश्‍वर येथे येणारे भाविक या धुनीसमोर आपला माथा टेकवून मोठ्या आत्मीयतेने नतमस्तक होत आहे.
कळस बुद्रुक येथे सन 1981 साली निसर्ग संवर्धक सुभाषपुरी महाराज यांचे आगमन झाले.सुरुवातीला टेकडीखाली असलेल्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात बाबांचे मन काही रमले नाही. त्यामुळे बाबांनी आपला मुक्काम शेजारीच असलेल्या एका उजाड टेकडीकडे वळविला. पुरातन कळसेश्‍वर मंदिराच्या डाव्या बाजूला बाबांनी एक पर्णकुटी उभारली. या कुटीतच बाबांनी एक धुणी पेटवली. या कुटीत बसूनच बाबा धुणीवर स्वयंपाक व ध्यानधारणा करीत असे. या कुटीत अनेक वर्षे बाबांनी मुक्काम केला. मात्र काही वर्षांनंतर कळसेश्‍वर देवस्थानचे रुपडे पलटू लागले. मंदिरावर विविध विकासकामे झाली. उजाड टेकडी बाबांच्या अथक परिश्रमाने हिरवी गर्द झाली. मंदिराच्या आवारात विविध देवदेवतांची मंदिरे उभारण्यात आली. त्यांनतर या मंदिराचा जीर्णोद्धार ही मोठया थाटामाटात पार पडला. परंतु सुरुवातीस बनविलेली पर्णकुटी आजही त्याठिकाणी आहे. त्याच अवस्थेत ठेवण्याचा निर्णय सुभाषपुरी महाराजांनी घेतला. परिणामी आजही बाबांची पर्णकुटी मंदिराचा कायापालट झालेल्या मध्यवर्ती ठिकाणावर आहे. ही पर्णकुटी आहे, त्याच अवस्थेत आजही दिसते आहे. या कुटीत पेटविण्यात आलेल्या धुनीवर बाबा भावीकासाठी चहा बनवित असे. कळसेश्‍वराच्या टेकडीचे नंदनवन होऊन देखील बाबांनी सुरुवातीस निवार्‍यासाठी बनविलेल्या पर्णकुटीतच राहणे पसंद केले. विशेष म्हणजे बाबांनी 1981 साली पेटविलेली धुणी आत्तापर्यंत कधीच विझली नाही. ही धुणी 37 वर्षांनंतरही पेटलेल्याच अवस्थेत असून बाबांच्या पश्‍चात्य देखीलही धुणी आज ही अविरतपणे तेवत आहे.