Breaking News

वर्धा जिल्हा बँकेची निवडणूक कधी घेणार- हायकोर्ट


नागपूर: मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने वर्धा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक कधी घेणार अशी विचारणा राज्य सरकारला केली आहे. यासंदर्भात सहकार विभागाचे सचिव, सहकार आयुक्त व अन्य प्रतिवादींना नोटीस बजावून यावर 17 जुलैपर्यंत उत्तर दाखल करण्याचा आदेश दिला आहे. यासंदर्भात संजय कामनापुरे व इतर चौघांनी दाखल केलेल्या याचिकेवर आज, शुक्रवारी न्या. भूषण धर्माधिकारी व न्या. झेड. ए. हक यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. बँकेच्या संचालक मंडळाची मागील निवडणूक 9 ऑगस्ट 2008 रोजी झाली होती. त्या संचालक मंडळाचा 5 वर्षांचा कार्यकाळ 8 ऑगस्ट 2013 रोजी संपला. त्यानंतर संचालक मंडळाने राजीनामे दिल्यामुळे बँकेवर दोन सदस्यीय प्रशासक मंडळ बसविण्यात आले. त्या प्रशासक मंडळाची सहा महिन्यांची मुदत संपल्यानंतर 24 एप्रिल 2015 रोजी वर्धा जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली 3 सदस्यीय प्रशासक मंडळ बसविण्यात आले. ही पर्यायी व्यवस्था बंद करून बँकेची सर्वसाधारण निवडणूक तातडीने घेण्यात यावी अशी विनंती याचिकेद्वारे करण्यात आली आहे.