Breaking News

नगर-सोलापूर महामार्ग झाला खड्डेमय आणि जलयुक्त!

।  नगरमार्गे येणार्‍या बसेस बंद; प्रवाशांची प्रचंड गैरसोय 

अहमदनगर, दि. 25, सप्टेंबर - मागी आठवड्यात झालेल्या जोरदार पावसामुळे नगर सोलापूर महामार्गवर मोठेमोठे खड्डे पडले आहेत. त्याबरोबरच हा महामार्ग  अनेक ठिकाणी खचला आहे. महामार्गाच्या साईड पट्ट्या पूर्णपणे नामशेष झाल्या आहेत. त्यातच महामार्गावरील अवजड वाहतुकीमुळे या महामार्गाची पूर्णपणे वाट  लागली आहे. पावसाच्या पाण्यामुळे नगर-सोलापूर हा जलयुक्त महामार्ग बनला आहे. यामुळे मिरजगाव ते नगर पर्यंत 55 किलोमीटर अंतर पार कापण्यासाठी तीन  तास लागत आहेत. परिणामी मिरजगाव ते नगरमार्गे दहवणार्‍या सर्व एस. टी. बसेस गाड्या बंद करण्यात आलेल्या आहेत. तर लांब पल्ल्याच्या गाड्याचे मार्ग  वळविण्यात आलेले आहेत. त्यामुळे प्रवाशांची प्रचंड गैरसोय झाली आहे.
पावसामुळे नगर-सोलापूर महामार्ग हा वाहतुकीसाठी पूर्णपणे निकामी झालेला आहे. गेल्या चार वर्षांपासून सार्वजनिक बांधकामखात्याने या महामार्गाकडे पूर्णपणे दुर्लक्ष  केलेले आहे. या रस्त्यावरील टोलवसूली बंद करून हा मार्ग परत सार्वजनिक बांधकाम खात्याच्या ताब्यात मिळाला. टोलवसुली बंद झाल्यानंतर मात्र या रस्त्याची  देखभाल पूर्णपणे थांबविण्यात आली. निधी नसल्याने या महामार्गाची देखभाल केली जात नसल्याचे सांगितले जात आहे. नागरिकांनी आंदोलने करूनही सार्वजनिक  बांधकाम खात्याचे अधिकारी त्याला सामोरे जात नाहीत. आंदोलने मोडून काढली जातात.
या महामार्गाच्या बाजूला असणार्‍या पाणी वाहून नेणार्‍या गटारी पूर्णपणे बंद करण्यात आलेल्या आहेत. गटारी बुजवून त्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे करण्यात  आलेली आहेत. पावसाचे पाणी महामार्गावरून वाहताना दिसत आहे. महामार्गाला कोणीच वाली नसल्याने कोण कोठे हा महामार्ग खोदून खड्डे करील, यावर कोणताही  निर्बंध राहिलेला नाही.
महामार्ग बनलाय साक्षात मृत्यू
मिरजगावमधून जाणार्‍या नगर सोलापूर महामार्गावर दोन्ही बाजूने मोठी अतिक्रमणे झालेली आहेत. या अतिक्रमणामुळे महामार्ग अरुंद झाला आहे. रस्त्यावरील  खड्ड्यामुळे वाहनचालकांना वाहने चालवतांना सर्कस करावी लागत आहे. या महामार्गावरून वाहने चालविणे म्हणजे साक्षात मृत्युला आमंत्रण देणे, अशी अवस्था  झालेली आहे.