Breaking News

निळवंडे धरणातून बोटीच्या सहाय्याने वाळूउपसा

महसूल विभागाने तालुक्यातील प्रवरा, मुळा, आढळा खोर्‍यातील वाळूतस्करांवर वक्रदृष्टी दाखविली आहे. त्यामुळे महसूल विभागाला शह देण्यासाठी वाळूतस्करांनी आता थेट निळवंडे धरणातून बोटीच्या सहाय्याने वाळूउपसा सुरू केला आहे. सदरचा वाळूतस्कर पंचायत समितीचा माजी सदस्य असल्याने महसूल विभाग ही तोंडावर बोट ठेऊन गप्प बसले आहे.
तालुक्यातील मध्यंतरी वाळूतस्करांनी चांगलाच हैदोस घातला होता. या वाळू तस्करीवर प्रसारमाध्यमांनी जोरदार टीकेची झोड उठविल्यावर, अकोले महसूल विभागाने वाळू तस्करांना शांत राहण्याचे आवाहन केले होते. महसूल विभागाच्या आदेशाचे पालन म्हणून वाळू तस्करांनीदेखील काही दिवस आपली वाहने बंद ठेऊन महसूल विभागास सहकार्य केले. एर्‍हवी नदी पात्रांतून, शेतातील धड्यांमधून वाळूची चोरटी वाहतूक सुरू असल्याच्या बातम्या ऐकू येतात. मात्र अकोले तालुक्यात तर थेट निळवंडे धरणात वाळूतस्कर वाळू काढीत असल्याचे वास्तवदर्शी चित्र समोर आले. संबंधित वाळूतस्करांनी वाळू काढण्यासाठी मोठी यंत्रणा उभारली आहे. आशिया खंडातील सर्वात मोठा पूल म्हणून नावाजलेल्या पिंपरकणे पुलाजवळ ही वाळू आणून टाकली जाते. ही वाळू काढणे म्हणजे सोपी गोष्ट नाही, अगदी जीवावर बेतणारा पाण्यातून प्रवास करावा लागतो. मग कुठे धरणाच्या कडेला वाळूच्या धड्या नजरेस पडतात. सहसा होडीत बसण्याचे ही साहस न करणारे लोक वाळू काढण्यासाठी जीवघेणा प्रवास करतात. या भागात माजी पंचायत समिती सदस्याचे चांगलेच प्रस्थ असल्याने त्यांस सर्व यंत्रणा पाठिशी घालत आहे. या भागात वाळूचे मोठमोठे ढिगारे पहावयास मिळत आहेत. याच ठिकाणी दहा ते वीस कामगार जीव ओतून वाळू काढीत असल्याचे घटनास्थळी दिसून आले.नागरिकांच्या सोयीसाठी असलेल्या प्रवाशी होडीतून ही वाळू बाहेर आणली जाते. त्यापुढे ही वाळू ट्रॅक्टरमध्ये भरून इतरत्र पाठविली जाते. अतिशय जीवघेणा प्रवास करून ही वाळू बाहेर काढली जात असली तरी, अनेकजण या वाळूवर कोट्याधीश झाले असल्याचे पहावयास मिळत आहे. आता धरणातील पाणी कमी झाल्याने या वाळूतस्करांचे चांगलेच फावले आहे.थेट धरणाच्या पोटात शिरून वाळू काढण्याची ही संपूर्ण नगर जिल्ह्यातील पहिलीच घटना असावी. 

निळवंडे धरणातून वाळू काढणे, ही सोपी गोष्ट नाही. मात्र माजी पंचायत समितीच्या वजनदार नावामुळे ही वाळूतस्करी जोरात सुरू आहे. होडीच्या सहाय्याने वाळूला पाण्याबाहेर काढले जाते. मग ही वाळू हजारो रुपये ब्रास या दराने विकली जाते. महसूल विभाग आता या वाळूच्या ठेक्यावर कारवाई करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.