Breaking News

अजित पवारपुत्र पार्थ यांची काळे उद्योग समुहाला भेट


कोपरगाव ता. प्रतिनिधी : राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे ज्येष्ठ चिरंजीव पार्थ पवार यांनी नुकतीच कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना आणि उद्योग समुहाला आज {दि. ९} सदिच्छा भेट दिली. तत्पूर्वी सकाळी युवा नेते आशुतोष काळे आणि पार्थ पवार यांनी शिर्डी येथे जाऊन साईबाबा समाधीचे दर्शन घेतले. 

कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन युवा नेते आशुतोष काळे यांनी कारखाना कार्यस्थळावर त्यांचे स्वागत केले. पार्थ पवार यांनी कर्मवीर शंकरराव काळे स्मृती उद्यानाला भेट देवून माजी खासदार, शिक्षण महर्षि कर्मवीर शंकरराव काळेंच्या शिक्षण, सहकार व सामाजिक कार्य स्मृतीउद्यानाच्या माध्यमातून जवळून अनुभवले. युवा नेते काळे यांच्या संकल्पनेतून स्मृती उद्यानामध्ये मांडण्यात आलेला कर्मवीर शंकरराव काळे यांचा जीवनपट अतिशय समर्पकपणे मांडण्यात आला आहे. यावरून कर्मवीर शंकरराव काळे यांचे समाजासाठी सर्वच क्षेत्रात दिलेले योगदान किती महान होते, याची जाणीव होत असल्याचे पार्थ पवार म्हणाले. कर्मवीर शंकरराव काळे साहेबांचे कार्य आजपर्यंत खूप ऐकून होतो. परंतु आज त्यांच्या स्मृतीस्थळाला प्रत्यक्ष भेट दिल्यांनतर त्यांचे सामाजिक कार्य समक्षपणे पाहिल्याची अनुभूती येत असल्याचे ते म्हणाले. 

पार्थ यांनी माजी आ. अशोक काळे यांची त्यांच्या निवासस्थानी माहेगाव देशमुख येथे जाऊन भेट घेतली. यावेळी माजी खा. शिक्षणमहर्षि, कर्मवीर शंकरराव काळे, माजी आ. अशोक काळे आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्र पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कौटुंबिक मैत्रीपूर्ण जिव्हाळ्याच्या संबंधाना यावेळी झालेल्या चर्चेतून उजाळा मिळाला. काळे परिवार व पवार कुटुंबाचे वर्षानुवर्षांपासून घनिष्ठ ऋणानुबंध आहेत. ही आपली कौटुंबिक भेट असल्याचे त्यांनी सांगितले.