Breaking News

स्कूल बस तपासणीसाठी रात्री एक वाजल्यापासून रांगा; मात्र दुपारपर्यंत अधिकारी फिरकलेच नाहीत

पुणे, दि. 01 - प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत शहरातील सुमारे चौदाशे स्कूल बसची वाहन योग्यता तपासणी करण्यात आली आहे. शाळा सुरू होण्यास दोन आठवडे शिल्लक असताना अद्यापही सुमारे 2300 बसची तपासणी बाकी आहे. मागील वर्षीही स्कुल बस चालकांच्या प्रतिसादाअभावी स्कुल बस तपासणीची मुदत दोनदा वाढविण्यात आली होती. यंदा मात्र मुदत वाढविण्याची घोषणा करण्यात आली नसली तरी एखाद्या शाळेत दहा किंवा त्यापेक्षा अधिक स्कूल बस असल्यास आरटीओचे अधिकारी संबंधीत शाळेत जाऊन तपासणी करणार असल्याचे सांगण्यात आले. यामुळे आरटीओ कार्यालयात स्कूल बसच्या रांगा कमी होतील तसेच स्कूल बस धारकांनाही तपासणी सोईची होईल. मात्र बुधवारी प्रत्यक्षात आरटीओ कार्यालयात परिस्थिती बघता रात्री एक वाजल्यापासून बस चालक रांगेत उभे होते. तरीही दुपारी दोन वाजेपर्यंत एकही अधिकारी बस तपासणीसाठी फिरकला नव्हता .
शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी स्कुल बसची तपासणी करुन फिटनेस प्रमाणपत्र घेणे आवश्यक आहे. ते न घेतल्यास आरटीओ दंडात्मक कारवाई बरोबरच बसही अटकावून ठेऊ शकते. मागील काही वर्षात शाळा सुरु झाल्यावर कारवाई केल्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत होते. यामुळे मागील वर्षीपासून उच्च न्यायालयाच्या आदेशानूसार उन्हाळ्याच्या सुट्टीत सर्व स्कूल बस आणि व्हॅनची तपासणी करण्यात येत आहे. त्यानुसार 15 एप्रिल ते 15 जून या कालावधीत सर्व स्कूल बस आणि स्कूल व्हॅन मालकांनी वाहनांची तपासणी करून घेण्याचे आवाहन आरटीओने केले होते. आरटीओच्या आळंदी रस्त्यावरील कार्यालयात ही निःशुल्क तपासणी केली जात आहे. आतापर्यंत दीड महिन्यात सुमारे चौदाशे स्कूल बसची तपासणी करून योग्यता प्रमाणपत्र देण्यात आले आहे. मात्र आता शाळा सुरु होण्यास अवघे दोन आठवडे शिल्लक असल्याने
आळंदी रस्त्यावरील फुलेनगर येथील आरटीओ कार्यालयात स्कूल बसच्या रात्रीपासूनच तपासणीसाठी रांगा लागलेल्या आहेत. शहरात 3700 स्कूल बस आहेत. गेल्या वर्षीही तपासणी मोहीम राबविण्यात आली होती. त्या वेळी स्कूल बस चालकांकडून अत्यल्प प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे तपासणीची मुदत दोन वेळा वाढविण्यात आली होती. यंदाही मुदत वाढवून दिली जाणार की, तपासणी न करणार्‍या स्कूल बसचे परवाने रद्द करण्याचा निर्णय घेण्यात येणार हा प्रश्‍न उपस्थित होत आहे.